'एण्डलेस खुशियाँ' लघुपटातून अवयवदानाची जनजागृती

परशुराम कोकणे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

दान केल्याने एक वेगळा आनंद मिळतो हे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले आहे. अवयवदान केल्याने तर आपण मृत्यूनंतरही इतरांच्या आयुष्यात आनंद आणू शकतो. मी स्वत: अवयवदानाचा फॉर्म भरला आहे. याच विषयावर मित्रांच्या मदतीने "एण्डलेस खुशियाँ' या लघुपटाची निर्मिती केली आहे.
- विश्‍वजित बनसोडे, विद्यार्थी, दयानंद महाविद्यालय

सोलापूरच्या तरुणांचा प्रयत्न; पाच मिनिटात केली मांडणी

सोलापूर : मृत्यूनंतर अवयवदान केल्याने एखाद्याला नवे आयुष्य मिळू शकते. प्रत्येकाने अवयवदानाचा फॉर्म भरावा आणि इतरांना आनंद द्यावा हा संदेश देण्यासाठी सोलापूरच्या तरुणांनी "एण्डलेस खुशियाँ' या लघुपटाची निर्मिती केली आहे. पाच मिनिटाच्या लघुपटाचे नव्वद टक्के चित्रीकरण पूर्ण झाले आहे. हा लघुपट वेगवेगळ्या शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठविण्यात येणार आहे.

अपघात किंवा अन्य घटनेतून एखाद्या व्यक्तींचे अवयव निकामी होऊन मृत्यू येतो. अशा व्यक्तींना आपण अवयवदान करून वाचवू शकतो. मृत्यूनंतरही आपण कसे उपयोगी पडू शकतो आणि इतरांना कसा आनंद देऊ शकतो हे "एण्डलेस खुशियाँ' या लघुपटातून मांडण्यात आले आहे. अवयवनादासाठी काम करणाऱ्या एका संस्थेचे उपक्रम पाहून दयानंद महाविद्यालयात प्राणीशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विश्‍वजित बनसोडे याने "एण्डलेस खुशियाँ' या लघुपटाची निर्मिती करण्याचे ठरविले.

गेल्या आठवड्यात सोलापूर परिसरात चित्रीकरण करण्यात आले आहे. विश्‍वजित यानेच लघुपटाचे लेखन असून दिग्दर्शकही तोच आहे. अर्जुन कासेगाव हे सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहत आहेत. तर सिद्धार्थ तळभंडारे आणि ज्ञानेश्वर हराळे हे सहदिग्दर्शक आहेत. मुख्य भूमिकेत आमीर दंडोती, अमोल कांबळे, निखिल अरसिद, आकीब मुल्ला, हनुमंतु सलगर, सतीश कुलकर्णी, सिद्धार्थ तळभंडारे, अर्जुन कासेगाव हे आहेत.

Web Title: solapur news endless khushiyan documentary organisation