दूध उत्पादकांना दररोज 36 लाख वाढीव मिळणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

राज्याच्या इतिहासात सर्वाधिक दर 
राज्याच्या दूध संकलनाच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच गाईच्या दुधाच्या एका लिटरच्या खरेदीसाठी दूध उत्पादकांना 27 रुपयांचा भाव दिला जाणार आहे. तीन वर्षापूर्वी हा दर 14 ते 16 रुपये प्रतिलिटर इतकाच होता. त्यामध्ये 10 ते 11 रुपयांची वाढ झाली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 
 

सोलापूर : राज्यात एक जूनपासून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाचे चांगले फलित होत असल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनादरम्यान शासनाने 20 जूनपूर्वी दुधाच्या खरेदीदरामध्ये वाढ करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार गाईच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये तब्बल तीन रुपये वाढ केल्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज सरासरी 36 लाख रुपये वाढीव मिळणार आहेत. 

राज्यभर शेतकरी आंदोलनाची धार तीव्र झाली होती. एक जूनपासून राज्यभर शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला होता. त्याचवेळी दुधाच्या दरामध्ये सुधारणा करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तो शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याचे आजच्या आदेशावरून स्पष्ट झाले आहे. 

3.5 फॅट व 8.5 एसएनएफ असलेल्या गुणप्रतीच्या गाईच्या एक लिटर दुधासाठी 24 रुपये खरेदी दर निश्‍चित केला होता. त्यामध्ये तीन रुपयांची वाढ करत तो 27 रुपये प्रतिलिटर इतका केला आहे. त्याच्या पुढील वाढीव फॅटसाठी 30 पैशांची वाढ कायम ठेवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे गाईच्या दरामध्ये वाढ झाली तशीच म्हशीच्या दूध खरेदी दरामध्येही तीन रुपयांनी वाढ झाली आहे. 

जिल्ह्यात दररोज सरासरी 12 लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते. जिल्हा दूध संघ, तीन तालुका संघ, 25 खासगी संघ व तीन मल्टिस्टेट दूध संघाच्या माध्यमातून दररोज सरासरी 12 लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते. शासनाने दुधाच्या खरेदी दरामध्ये तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज तब्बल 36 लाख रुपये वाढीव रक्कम मिळणार आहे. येत्या 21 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

Web Title: solapur news milk rates revenue increases