सोलापूर बंदला संमिश्र प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला श्री सिद्धेश्‍वरांचे नाव द्यावे या मागणीसाठी शिवा संघटनेने पुकारलेल्या  बंदला सकाळच्या सत्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला श्री सिद्धेश्‍वरांचे नाव द्यावे या मागणीसाठी शिवा संघटनेने पुकारलेल्या  बंदला सकाळच्या सत्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

लिंगायत समाजातील नेत्यांचे वर्चस्व असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी कांद्याचे व्यवहार झाले. तर भाजीविक्रेत्यांचे व्यवहारही सुरळीत होते. शहराच्या मध्यवर्ती भागातील नवी पेठ, मधला मारुती, भुसार गल्ली, चाटी गल्ली येथे काही दुकाने बंद तर काही सुरु होती. दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बंदच्या संयोजकांतर्फे सकाळी श्री सिद्धेश्‍वर मंदीरात महाआरती करण्यात आली. सिद्धेश्‍वर देवस्थान समिती संचलित शाळांमध्ये अघोषित सुटी जाणवली. वीर तपस्वी शाळेच्या मुख्याध्यापकांनी अचानकपणे सुटी जाहीर केल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. एखाद्या संस्थेने आवाहन केल्यामुळे शाळा बंद ठेवता येते का, असा प्रश्‍न उपस्थित करीत या शाळेवर शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशीही मागणी पालकांनी केली. उर्वरीत ठिकाणच्या शाळा मात्र नियमित सुरु होत्या. एकंदरीत सकाळच्या सत्रात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

Web Title: Solapur News mixed response to strike