मुघलांचे धडे इतिहासातून गायब

संतोष सिरसट
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

सातवीच्या इतिहास पुस्तकातील धड्यांची संख्या चारवरून एकवर

सातवीच्या इतिहास पुस्तकातील धड्यांची संख्या चारवरून एकवर
सोलापूर - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून सातवीसाठी तयार केलेल्या "इतिहास व नागरिकशास्त्र' हे पुस्तकातून मुघलांचे तीन धडे गायब झाले आहेत. मागील वर्षी असलेल्या "मध्ययुगीन भारताचा इतिहास' या पुस्तकात मुघलांशी संबंधित चार धडे होते. यंदाच्या वर्षी नव्याने तयार करण्यात आलेल्या पुस्तकात धड्यांची संख्या एकच ठेवली आहे.

प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या इयत्तांचे अभ्यासक्रम बदलले जातात. त्यानुसार यंदाच्या वर्षी यंदा सातवी व नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. यात सातवी व नववीची इतिहास या विषयाची पुस्तके आता चर्चेत आली आहेत. मागील वर्षी सातवीसाठी "मध्ययुगीन भारताचा इतिहास' हे पुस्तक होते. यंदाच्या नव्या पुस्तकाचे नाव बदलून "इतिहास व नागरिकशास्त्र' असे करण्यात आले आहे. या नव्या पुस्तकात केवळ मुघलांशी संघर्ष या एकाच धड्याचा समावेश केला आहे. मागील वर्षीच्या पुस्तकात मुघल सत्तेची स्थापना व विस्तार, मुघल सत्तेचा विस्तार, मुघलकालीन समाजजीवन, मुघलांशी संघर्ष या चार धड्यांचा समावेश होता. या चार धड्यांपैकी केवळ मुघलांशी संघर्ष हा एकच धडा यंदाच्या इतिहासाच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे.

मुघलांच्या सत्तेची सुरवात बाबर यांच्यापासून झाली. त्यांच्यानंतर हुमायूँ, शेखशाह सूर, अकबर, जहॉंगीर, नूरजहॉं, शाहजहान, औरंगजेब या मुघलांनी देशातील अनेक भागावर राज्य केले. सातवीच्या नव्या पुस्तकात हा सगळा भाग वगळण्यात आला आहे. त्याचबरोबर शेरशाहचे नाणे-रुपया याचाही उल्लेख नव्या पुस्तकात नाही. मुघलकालीन आर्थिक जीवन, समाजजीवन, मुघलकालीन नाणी, वास्तुकला, चित्रकला, वाङ्‌मय या गोष्टी नव्या पुस्तकातून गायब झाल्या आहेत. मागील वर्षीच्या सातवीच्या पुस्तकामध्ये बुलंद दरवाजा, ताजमहाल, लाल किल्ला यांची छायाचित्रे होती. तीही नव्या पुस्तकातून गायब झाली आहेत.

मराठ्यांच्या इतिहासाला प्राधान्य
मागील वर्षी सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये मोठ्या प्रमाणात मुघलांच्या धड्यांचा समावेश होता. यंदाच्या नव्या इतिहासाच्या पुस्तकात मात्र मराठ्यांच्या इतिहासाचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे. एकूणच मराठ्यांच्या इतिहासाला प्राधान्य दिले आहे.

Web Title: solapur news moghal lesson release in history book