जुगार अड्ड्यावर पोलिसच खेळत होते अंदर-बहार! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

शहरातील अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. जुगार खेळताना सापडलेल्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई केली आहे. जुगार खेळणे किंवा अन्य अवैध धंद्यात सहभागी होऊन पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येईल. शहरात कोणत्याही भागात अवैध धंदे चालू असतील तर तत्काळ नियंत्रण कक्षातील 100 या क्रमांकावर माहिती द्यावी. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

सोलापूर : शहरातील अवैध धंदे बंद व्हावेत, यासाठी एकीकडे पोलिस आयुक्त महादेव तांबडे हे प्रयत्नशील असताना दुसरीकडे पोलिसच जुगार अड्ड्यावर बसून जुगार खेळत असल्याचे शुक्रवारी रात्री समोर आले. अशोक चौक परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अंदर-बहार नावाचा जुगार खेळणाऱ्या ग्रामीण पोलिस दलातील तिघा आणि शहर पोलिस दलातील एका पोलिसासह सहा जणांना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिस दलातील वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार अल्लाबक्ष सत्तार सय्यद (वय 55, रा. रविवार पेठ, बोरामणी नाका चौकाजवळ, सोलापूर), कामती पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक भरत देवू बागल (वय 30, रा. न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर), वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक रशीद अब्दुल शेख (वय 32, रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर), शहर पोलिस दलातील सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राजशेखर शिवप्पा कटारे (वय 49, रा. राघवेंद्रनगर, सैफुल, सोलापूर), संतोष सुरेश मुदगल (वय 24, रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर), मदन श्रावण बेलभंडारी (वय 30, रा. न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर) अशी जुगार अड्ड्यावर सापडलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात जुगार अड्डा चालक रमेश पांडुरंग जाधव, पळून गेलेले तिघे अनोळखी व्यक्तीही आरोपी आहेत. आरोपी हे शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास अशोक चौक परिसरातील मस्तान हॉटेलच्या मागील पांडूरंग भिमराव जाधव याच्या घरात जुगार खेळत होते. पोलिस हवालदार संजय बायस यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

आयुक्तांना मिळाली खबर 
अशोक चौक परिसरात जुगार खेळला जात असल्याची खबर पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांना समजली. त्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला पाठवून ही कारवाई केली आहे. या गुन्ह्यात आरोपींकडून जुगाराचे साहित्य आणि 410 रुपये जप्त करण्यात आले आहेत. 

शहरातील अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. जुगार खेळताना सापडलेल्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई केली आहे. जुगार खेळणे किंवा अन्य अवैध धंद्यात सहभागी होऊन पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येईल. शहरात कोणत्याही भागात अवैध धंदे चालू असतील तर तत्काळ नियंत्रण कक्षातील 100 या क्रमांकावर माहिती द्यावी. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

Web Title: Solapur news police on gambler spot