तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य

रजनीश जोशी
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

उजनी जलाशयावर सौरऊर्जानिर्मिती करता येणे शक्‍य आहे. धरणाच्या कडेला, जलाशयाच्या मध्यभागी तरंगत्या सौर पॅनेलद्वारे ऊर्जा निर्माण करता येईल. त्यादृष्टीने आवश्‍यक ते बांधकाम करावे लागेल.
- डॉ. सतीश काशीद, धरण बांधकाम तज्ज्ञ अभियंता, वालचंद इन्स्ट्यिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, सोलापूर

केरळसह जगभरात प्रयोगातून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती
सोलापूर - उजनी धरणाच्या जलाशयावर तरंगते सौर पॅनेल (फ्लोटिंग पॅनेल) टाकून सौरऊर्जानिर्मिती करता येणे शक्‍य आहे. केरळमध्ये वायनाड जिल्ह्यातील बनसुरा सागर जलाशयावर अशा प्रकारचा प्रकल्प उभा करण्यात आला आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी "उजनी'वरील सौरऊर्जानिर्मिती प्रस्तावाचे सूतोवाच मंगळवेढ्यातील कार्यक्रमात नुकतेच केले होते. बनसुरा प्रकल्पात पाच लाख युनिट वीजनिर्मिती होत आहे. सौर "रूफ टॉप' आणि "फ्लोटिंग पॅनेल' अशा दोन्ही प्रकारांत वीज मिळू शकते.

सोलापूर जिल्ह्यातील हवामान आणि पाऊसमानाचा विचार करता उजनी जलाशयावर सौरऊर्जा अधिक प्रमाणात उपलब्ध होईल, इतकेच नव्हे तर जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवनही कमी होण्यास त्यामुळे मदत होण्याची शक्‍यता आहे. उजनी जलाशयाची व्याप्ती 138 चौरस मीटर इतकी प्रचंड आहे. सध्या तिथे जलविद्युतनिर्मिती प्रकल्प आहे. पण सौरऊर्जा प्रकल्प झाल्यास त्याचे अनेक फायदे आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळता उर्वरित आठ महिन्यांत सौरऊर्जा मिळू शकते. पावसाळ्यात जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित राहू शकतो.

उजनी धरणातून निघालेल्या कालव्यांची लांबीही प्रचंड आहे. त्यावरही सौर पॅनेल लावल्यास त्यातूनही वीजनिर्मिती होऊ शकते. असे प्रकल्प भारतात अनेक ठिकाणी यशस्वी झाले आहेत. एकट्या केरळातच असे चार प्रकल्प आहेत.

पोर्तुगालमध्ये मॉंटेलेग्रे महापालिकेने सौर आणि जलविद्युतनिर्मितीचा एकत्र प्रयोग केला आहे. 332 मेगावॉट वीज दोन्ही माध्यमांमध्ये मिळून तिथे निर्माण होते. चीनमध्ये हुईनॅन या कृत्रिम तलावावर 40 मेगावॉट सौरऊर्जानिर्मिती होती. माणसांनी बांधलेल्या या तलावावर इतक्‍या मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण होणारे जगातील हे पहिलेच उदाहरण आहे. लंडनमध्ये राणी एलिझाबेथ सरोवरावर, ब्राझीलमध्ये ऍमेझॉन नदीवर असे प्रयोग यशस्वी झाले आहेत.

असे होईल बांधकाम
धरणाच्या कडेला चार ते पाच मीटर खोली असेल तर त्यावर बांधकाम करून सौर पॅनेलचे स्ट्रक्‍चर उभे करता येते. धरणाच्या मध्यभागी 25 मीटर खोली असेल, तर तिथे तरंगते सौर पॅनेल्स टाकता येतील. धरणातील गाळाचा मात्र नेमका अंदाज घ्यावा लागेल.

Web Title: solapur news power generation on ujani dam by floating solar panel