उपळाईच्या रोहिणी भाजीभाकरे सेलमच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी

अक्षय गुंड
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

रोहिणी भाजीभाकरे-बिदरी या 2008 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 118 व्या क्रमांकाने आयएएस म्हणून उत्तीर्ण झाल्या होत्या.

उपळाई बुद्रूक (ता. माढा, जिल्हा - सोलापूर) - तमिळनाडू राज्यातील मदुराई येथे कार्यरत असलेल्या उपळाई बुद्रूकच्या कन्या तथा अप्पर जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांची नुकतीच सेलम जिल्ह्याच्या (तमिळनाडू) जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. सेलम जिल्ह्याच्या त्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी आहेत.

रोहिणी भाजीभाकरे-बिदरी या 2008 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 118 व्या क्रमांकाने आयएएस म्हणून उत्तीर्ण झाल्या होत्या. प्रशिक्षणानंतर त्यांची तमिळनाडू राज्यात नियुक्ती करण्यात आली होती. मदुराई जिल्ह्याच्या सहायक जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी व तिरूमेलवेली च्या उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांनी मुदुराई जिल्ह्यात माहात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 'मनरेगा' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते 'स्वच्छता चॅम्पियन्स' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांची प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तमिळनाडू सरकारने त्यांना सेलम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सेलम जिल्ह्याच्या त्या 171 व्या जिल्हाधिकारी आहेत.

Web Title: solapur news rohini bhajibhakare selam's first lady collector