लाखमाेलाचे स्मृती वन गेले विस्‍मृतीत

लाखमाेलाचे स्मृती वन गेले विस्‍मृतीत

हर्षल आकुडे 
गुरुवार, 1 जून 2017

सोलापूर - सोलापुरातील अनेकांच्या स्मृती वृक्षरूपात जपणारे स्मृती वनातील अवकाश निरीक्षणगृह बंद आहे. शासनाने लक्ष घालून स्मृती वनाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी होत आहे. 

सोलापूर - सोलापुरातील अनेकांच्या स्मृती वृक्षरूपात जपणारे स्मृती वनातील अवकाश निरीक्षणगृह बंद आहे. शासनाने लक्ष घालून स्मृती वनाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी होत आहे. 

स्मृती वनातील अंतर्गत रस्ते उखडलेले आहेत. लहान मुलांसाठी खेळ सुरू असले तरी झोपाळे मात्र गायब आहेत. बांधकामाकरिता वापरण्यात आलेली खडी, विटा खूप दिवसांपासून उचलल्या नाहीत. रूफ टॉप हार्वेस्टिंग यंत्रणाही गंजून खराब झाली आहे. उद्यानातील अनेक कामे पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. स्मृती वन उद्यानामध्ये अवकाश निरीक्षणगृह, पक्षी लपणगृह असे पर्यटकांना आकर्षित करणारे उपकरणे आहेत. मात्र, याची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे ती सध्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. खुल्या सभागृहाच्याही कंपाउंडवरील विटा सैल झाल्या आहेत. पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना पाण्याची सोय नाही. पाण्यासाठीचे नळ गंजले आहेत. स्वच्छतागृहांचा वापर स्टोअररूम म्हणून केला जातो. त्यामुळे सुविधेअभावी पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. सकाळी व संध्याकाळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येतात; मात्र ती संख्याही खूप कमी आहे. 

कंबर तलावाच्या पाण्यामुळे  झाडे करपू लागली
कंबर तलावाच्या प्रदूषित पाण्याचा परिणाम स्मृती वनातील अनेक झाडांवर झाला आहे. घाण पाणी मुळ्यांना सतत लागल्याने मुळ्यांमध्ये कीड येऊन तलावाच्या बाजूची झाडे मरू लागली आहेत. ही झाडे आधी कोरडी पडतात. त्यानंतर साल झडू लागते व केवळ झाडांचा बुंधा शिल्लक राहतो. मुळ्यांना कीड लागल्याने त्यांची वाढ होत नाही. काही दिवसांनी झाड नष्ट होते, अशी माहिती येथे मिळाली.  

स्मृती वन उद्यानात बालोद्यान, पॅगोडा, रस्ते, टेलिस्कोप दुरुस्ती, सौर दिवे, कंपाउंड आदी कामे करण्याचा मानस आहे. कर्मचारी, तज्ज्ञ व निधीची कमतरता, अन्य नैसर्गिक बाबींमुळे नियोजन शक्‍य होत नाही. सध्या उद्यानाला एक कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे. याबाबत जानेवारी महिन्यात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत याला मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरवात होईल.
- बाळासाहेब उबाळे, सहायक वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग 

अवकाश निरीक्षणगृह, लपणगृह बंद आहेत. पर्यावरण ग्रंथालयही अद्याप सुरू करण्यात आले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या विषयात लक्ष घालावे. त्यांनी या ठिकाणी पाहणी करून समस्या सोडवाव्यात. उद्यानातील सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी. उद्यानात गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करावी. 
- बाबूराव पेठकर, पर्यावरण प्रेमी

Web Title: solapur news solapur