पीककर्जासाठी ‘डीसीसी’ला ९२ कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

सोलापूर - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने खरीप हंगामात पीककर्ज वाटप करण्यासाठी जिल्हा बॅंकेला ९२ कोटी २३ लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. गतवर्षी बॅंकेचा ‘सीआरएआर’ घसरल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने पीक कर्जासाठी रक्कम मिळाली नव्हती. यंदा बॅंकेचा सीआरएआर व नेटवर्थ सुधारल्याने मंजुरी मिळाली असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली. 

पीककर्ज वाटपाला सुरवात करण्यापूर्वी बॅंकेच्या संचालक मंडळाची मंजुरी आवश्‍यक आहे. ही मंजुरी २९ मे रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतली जाणार आहे. साधारणतः त्यानंतर एक आठवड्यात कर्जवाटप सुरू होणार असल्याची माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली. टंचाईग्रस्त गावांच्या कर्ज पुनर्गठणाच्या रकमेपैकी नाबार्डने ६० टक्के, राज्य सरकारने १५ टक्के, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने १० टक्के रक्कम देण्यास मान्यता मिळाली आहे. यामध्ये जिल्हा बॅंकेचा वाटा १५ टक्के असणार आहे. 

गेल्या वर्षी बॅंकेचा सीआरएआर सात टक्‍क्‍यांपेक्षा कमी म्हणजे ३.६० टक्के असल्याने राज्य सहकारी बॅंकेकडून जिल्हा बॅंकेला पीक कर्जासाठी निधी प्राप्त झाला नव्हता. यंदा बॅंकेचा सीआरएआर ११.५३ टक्के असल्याने राज्य बॅंकेने निधी देण्यास मान्यता दिली आहे. 

खरिपाच्या पीक विम्याचे ४६ कोटी मंजूर
सोलापूर जिल्ह्यातून खरीप २०१६ हंगामामध्ये ८३ हजार २२९ शेतकऱ्यांनी १३७ कोटी रुपयांचा पीकविमा भरला होता. त्यापैकी ४४ हजार ६१७ शेतकऱ्यांना खरिपाचा ४६ कोटी ६२ लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. जिल्हा बॅंकेच्या शाखांमधून खातेक्रमांक, खातेदार नाव, गाव याबाबतच्या छाननीचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होऊन आठ दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होण्याची शक्‍यता आहे. 

पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी गेल्या वर्षीच्या थकीत कर्जाच्या २० टक्के रक्कम भरणे आवश्‍यक आहे. ही रक्कम भरल्यानंतरच शेतकऱ्यांना यंदा पीककर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. 
- राजन पाटील, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

Web Title: solapur news solapur Solapur District Central Co-operative Bank