गाळप हंगाम आजपासून सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

सोलापूर - राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उद्यापासून (बुधवार) सुरू होत आहे. 238 साखर कारखान्यांपैकी 193 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी ऑनलाइन मागणी केली असून, त्यापैकी जवळपास 106 कारखान्यांना साखर आयुक्तालयाने परवाना दिला आहे. मागील वर्षी एफआरपी न दिल्यामुळे 17 कारखान्यांना गाळप परवाना नाकारला आहे. यंदा ऊस गाळपासाठी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा लागणार आहे. ज्याप्रमाणे गाळपासाठी स्पर्धा लागेल, त्याचप्रमाणे उसाचा पहिला हप्ता किती द्यायचा, याचीही स्पर्धा होण्याची शक्‍यता आहे.

मागील वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने उसाचे प्रमाण मर्यादितच आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यात उसासाठी स्पर्धा होण्याची शक्‍यता आहे. शासनाने दोन हजार 550 रुपयांची एफआरपी जाहीर केली असून, ती देणे कारखान्यांना बंधनकारक केले आहे. यंदाच्या वर्षी साखर आयुक्त कार्यालयाच्यावतीने गाळप परवाने ऑनलाइन दिले आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांना परवाना घेण्यासाठी होणारा त्रास संपला आहे.

स्पर्धक साखर कारखाना पहिल्या हप्त्यापोटी किती रक्कम शेतकऱ्यांना देतो, त्यावर आपल्या कारखान्याचा पहिला हप्ता ठरविण्याची रणनीती अनेक साखर कारखान्यांनी अवलंबिली आहे.

शेतकऱ्यांसाठी "अच्छे दिन'?
शेतकरी संघटनेने पहिल्या हप्त्यापोटी तीन हजार 400 रुपयांची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना जवळपास तीन हजार रुपयांची पहिली उचल अपेक्षित आहे. तेवढी रक्कम कोणता साखर कारखाना देतो हे महत्त्वाचे आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून (बुधवार) सुरू होणारा गाळप हंगाम शेतकऱ्यांसाठी "अच्छे दिन' घेऊन येणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: solapur news sugarcane galap season start