शिक्षकांचा उपयोग शिक्षकेतर कामासाठी 

संतोष सिरसट
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

सोलापूर - राज्यातील शिक्षकांना अध्यापनाशिवाय इतर कोणतेही काम देऊ नये, असे सरकारचे आदेश आहेत. मात्र, अद्यापही अनेक जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्तचे काम दिले जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढील काळात अध्यापनाशिवाय इतर कोणतेही काम शिक्षकांना दिले जाणार नसल्याचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहून द्यावे लागणार आहे. 

जिल्हा परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली जाते. प्रत्यक्षात अध्यापनासाठी नेमणूक केली असली, तरी त्यांना इतर अशैक्षणिक कामे लावली जातात. अनेक शिक्षक जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक म्हणून काम करत असल्याचेही ग्रामविकास विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर काही शिक्षकांना मुख्यालयात वेगळ्याच कामासाठी नियुक्त केले जात असल्याचेही दिसून आले आहे. शिक्षकांच्या नियुक्‍त्या शाळेवर दाखवून त्यांच्या सेवा अन्य कामासाठी वापरल्या जातात. याविषयी 1 ऑगस्टला ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरसिंग घेतली होती. त्यामध्ये ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर सचिवांनी नाराजी व्यक्त केली होती. 

त्याच वेळी सचिवांनी शिक्षकांना शैक्षणिक कामाशिवाय इतर कोणतेही काम देऊ नये, असे आदेश दिले होते. मात्र, तरीही अनेक जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शिक्षकांनी त्यांच्या दैनंदिनीमध्ये केवळ शैक्षणिक काम करणेच अपेक्षित आहे. शिक्षणाशिवाय इतर कोणतीही कामे करण्यास त्यांना मुभा दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आमच्याकडे शिक्षक अशैक्षणिक कामे करत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र ग्रामविकास विभागाला द्यावे लागणार आहे. 

काही शिक्षकांना सवलत 
विभागीय आयुक्त अथवा सरकारने शैक्षणिक कामाव्यतिरिक्त अन्य कामे करण्यास सांगितलेल्या शिक्षकांना यामधून वगळले आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने जे शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर शिक्षणाधिकाऱ्यांकडे मॅपिंगचे काम करत आहेत, केवळ अशा शिक्षकांना 15 दिवसांची सवलत दिली आहे.

Web Title: solapur news teacher