जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

शासनाने एका दिवसात बदलला निर्णय

शासनाने एका दिवसात बदलला निर्णय
सोलापूर - शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीच्या संदर्भात शासन दररोज नवनवीन आदेश काढत आहे. मंगळवारी (ता. 6) काढलेल्या शुद्धिपत्रकामध्ये एका दिवसातच बदल केला आहे. यावरून शिक्षकांच्या बदल्यांबाबत राज्याच्या शिक्षण विभागामध्येही संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसते; मात्र नव्या शुद्धिपत्रकामुळे बदलीपात्र शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या संदर्भात शासनाने 27 फेब्रुवारीला धोरण निश्‍चित करत आदेश काढले होते. या आदेशाला राज्यातील शिक्षकांनी प्रचंड विरोध केला आहे. त्याचबरोबर अनेक शिक्षक व संघटनाही न्यायालयात गेल्या आहेत. त्यानंतर शासनाने जवळपास पाच ते सहा शुद्धिपत्रके काढली आहेत. मंगळवारी काढलेल्या शुद्धिपत्रकामध्ये राज्याच्या शिक्षण विभागाला बुधवारी (ता. 7) बदल करावा लागला. आता नव्या शुद्धिपत्रकान्वये न्यायालयात गेलेल्या व "जैसे थे'चे आदेश मिळालेल्या शिक्षकांच्या जागेवर जिल्ह्यांतर्गत बदलीपात्र शिक्षकांना पसंतीक्रम देता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे राज्यातील अनेक शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे अनेक शिक्षकांनी या शुद्धिपत्रकाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी लगेचच सुरू केली होती; मात्र आजच्या शुद्धिपत्रकामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाच्या अधीन राहून बदली
न्यायालयात गेलेल्या ज्या शिक्षकांच्या बाबतीत न्यायालयाने "जैसे थे' स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत, त्या शिक्षकांच्या जागेवर जिल्ह्यांतर्गत बदलीपात्र शिक्षकांना पसंतीक्रम देता येणार आहे; मात्र त्या शिक्षकांच्या जागेवर होणारी बदली ही न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून होईल, असेही नव्या शुद्धिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title: solapur news teacher transfer in internal district