शिक्षकांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

सोलापूर - राज्यातील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर बदल्या करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने या बदल्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोमवारपर्यंत (ता. 17) विशेष संवर्ग दोनच्या शिक्षकांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसंदर्भात अनेक शिक्षक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्याबाबत नुकतीच सुनावणी होऊन न्यायालयाने या बदल्या करण्यास सरकारला सांगितले आहे. त्यानंतर लगेच ग्रामविकास विभागाने या बदल्यांचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. या बदल्यांमध्ये दोन भाग करण्यात आले आहेत. विशेष संवर्ग एक व दोन त्यातील विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीसाठी ऑनलाइन माहिती भरण्यासाठी उपलब्ध असलेली सुविधा शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी चार वाजता बंद करण्यात येणार आहे.

त्यानंतर सायंकाळी चारपासूनच सोलापूर, जालना, बीड, परभणी, लातूर या जिल्ह्यातील विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांना जिल्हाअंतर्गत बदली अर्ज ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष संवर्ग भाग दोनसाठी असलेली ही सुविधा सोमवारपर्यंत (ता. 17) उपलब्ध असेल. राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

संघटना हरल्या, सरकार जिंकले
ग्रामविकास विभागाने बदल्यांचा आदेश काढल्यानंतर त्याला सर्वच स्तरातून विरोध झाला. काही ठिकाणी त्याचे स्वागतही झाले. आदेशाविरोधात शिक्षक संघटना न्यायालयात गेल्यामुळे ही प्रक्रिया 31 मेपूर्वी पूर्ण करणे अशक्‍य झाले. मात्र, शेवटी या प्रकरणात "शिक्षक संघटना हरल्या, तर सरकार जिंकले' अशीच स्थिती झाली.

Web Title: solapur news teacher transfer sanction