कारवाई टाळण्यासाठी 20 टक्के वाहनधारक घालतात हुज्जत 

परशुराम कोकणे 
गुरुवार, 22 मार्च 2018

वाहतूक सुरक्षित होण्यासाठी आम्ही प्रबोधन करत असतो. वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या आम्ही नागरिकांना दाखवतो. नियम पाळा, जीव धोक्‍यात घालू नका हे आम्ही सांगतो. अपघातांत 18 ते 35 वयोगटातील वाहन चालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. दुचाकीला दोन आरसे नसतील, टायर खराब असेल तरी दंड करता येतो. पण दंड भरण्यास अनेकजण टाळाटाळ करतात. 
- संतोष काणे, पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा

सोलापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर कारवाईसाठी वाहतूक पोलिस अडवितात. कारवाईसाठी थांबवल्यानंतर अनेक वाहनधारक माझं काही चुकलंच नाही असे म्हणत हुज्जत घालण्याचा प्रयत्न करतात. सोलापुरात अशा वाहनधारकांचे प्रमाण 20 टक्के आहे. तर कारवाईसाठी थांबविल्यानंतर 30 टक्के वाहनधारक खिशात पैसे नाहीत असे उत्तर देता, असे पोलिसांनी सांगितले. 

कारवाई होऊ नये, पोलिसांच्या तावडीतून सुटका होण्यासाठी काही वाहनधारक कोणाला तरी फोन करून पोलिसांशी संभाषण करण्याचा प्रयत्न करतात. यात वाहतूक पोलिसांचा बराच वेळ जातो. तासभर थांबून विनवणी करणारे नमुनेही पोलिसांना भेटतात. शेवटी त्याला समज देऊन सोडावे लागते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिला वाहनधारकांना शक्‍यतो पोलिस अडवत नाहीत. महिला वाहनधारकांना अडवून कारवाई करण्यासाठी महिला पोलिसांची गरज आहे. पोलिसांनी कारवाईसाठी थांबवल्यानंतर आजवर आम्हाला कोणीच अडवले नव्हते. तुम्हीच पहिल्यांदा अडवले असे म्हणत त्याही वाद घालण्यास सुरवात करतात. चुकीच्या दिशेने वाहन चालविण्याचे प्रमाण महिलांत अधिक आहे. 

तत्कालीन पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या कालावधीपासून लायसन्स व कागदपत्रे सोबत ठेवण्याबाबत सोलापूरकरांमध्ये जनजागृती झाली आहे. 70 टक्के वाहनचालक सोबत लायसन्स ठेवतात. नवी पेठेत पारस इस्टेटकडून दत्त चौकाकडे जाणारा रस्ता वन वे आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने तेथे अधुनमधून कारवाई केली जाते. हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी आम्हाला माहीतच नाही असे म्हणत वाहनचालक पोलिसांशी वाद घालतात. सिग्नलला पिवळा दिवा दिसल्यानंतर वाहनाचा वेग कमी करावा, पण सोलापुरात वाहनधारक पिवळा दिवा लागल्यानंतर वेगाने वाहन पुढे नेतात. पिवळा दिवा लागल्यानंतर वेग कमी करा, पाहा आणि मग पुढे जा असा अर्थ आहे. 

महिला वाहनधारक.. 
- रॉंग साइडने जाण्याचे प्रमाण अधिक. 
- वाहन चालविण्याचा परवाना सोबत नसतो. 
- अनेक महिलांकडे वाहनाची कागदपत्रेही नसतात. 
- विनंती करून गाडी सोडविण्यावर भर असतो. 
- दुचाकीवर तिघे जाणाऱ्यांची संख्या जास्त. 
- दंड भरणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी आहे. 

वाहतूक सुरक्षित होण्यासाठी आम्ही प्रबोधन करत असतो. वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या आम्ही नागरिकांना दाखवतो. नियम पाळा, जीव धोक्‍यात घालू नका हे आम्ही सांगतो. अपघातांत 18 ते 35 वयोगटातील वाहन चालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. दुचाकीला दोन आरसे नसतील, टायर खराब असेल तरी दंड करता येतो. पण दंड भरण्यास अनेकजण टाळाटाळ करतात. 
- संतोष काणे, पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा

Web Title: Solapur news traffic police action against two wheeler