'परखड बातम्या देणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढावी'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सोलापूर - वर्तमानपत्रांमध्ये सध्या व्यावसायिक स्पर्धा खूपच वाढली आहे. या स्पर्धेच्या युगात कोणाचेही चारित्र्यहनन होणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवे. हे करत असताना परखड लिहिणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढायला हवी, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. 

सोलापूर - वर्तमानपत्रांमध्ये सध्या व्यावसायिक स्पर्धा खूपच वाढली आहे. या स्पर्धेच्या युगात कोणाचेही चारित्र्यहनन होणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवे. हे करत असताना परखड लिहिणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढायला हवी, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. 

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य राज्यस्तरीय पत्रकार व ज्येष्ठ पत्रकार बाबूराव जक्कल जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कारांचे वितरण आज त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. हे पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी आणि ‘सकाळ’ चे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांना देण्यात आले. या वेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे उपस्थित होते.

श्री. तावडे म्हणाले, पत्रकारिता ही मोठी जबाबदारी आहे. समाजामध्ये निर्माण झालेली ही व्यवस्था दुरुस्त करायची आहे. त्यासाठी पत्रकारांनी खऱ्या बातम्या देण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्या बातम्या देताना त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे. अनेकवेळा शिक्षण विभागाच्या बातम्या रंगवून दिल्या जातात, असेही श्री. तावडे यांनी सांगितले. पत्रकार संघाचे अध्यक्ष खेलबुडे यांनी पत्रकारांच्या घरांचा प्रश्‍न मार्गी लावण्याची विनंती श्री. तावडे यांच्याकडे केली. श्री. जोशी व श्री. पाठक यांनी आपले विचार व्यक्त केले. या वेळी ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे, दत्ता गायकवाड, इंद्रजित पवार, अविनाश महागावकर आदी उपस्थित होते.

Web Title: solapur news vinod tawde reporters