राज्यात "झेडपी' शिक्षकांच्या 23 हजार जागा रिक्त 

संतोष सिरसट
बुधवार, 24 जानेवारी 2018

सोलापूर - राज्यात एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाने गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या 23 हजार 435 जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमावर होत असून, शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेतही अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. 

खासगी अनुदानित शाळांत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेतील रिक्त पदांवर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, त्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खासगी अनुदानित शाळांत अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचे पद पुन्हा निर्माण झाल्यास त्या शिक्षकाचे समायोजन पुन्हा त्यांच्या मूळ शाळेत केले जाणार असून, मूळ शाळेने त्या शिक्षकाचे समायोजन करून घेण्यास नकार दिल्यास त्यांचे पद रद्द होणार आहे. एकीकडे अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठी असताना, दुसरीकडे रिक्त पदांची संख्या त्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करून उर्वरित रिक्त जागांवर नव्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. 

राज्यातील हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गाचे एकही पद रिक्त नाही. मात्र, सहावी ते आठवीच्या वर्गासाठी असलेल्या शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यात चंद्रपूर-781, हिंगोली-740, अकोला-721, नागपूर-598, गडचिरोली-541 यांचा समावेश आहे. 

"झेडपी'च्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे 
पहिली ते पाचवी - 8261 
सहावी ते आठवी - 14995 
नववी ते दहावी - 179 

एक हजारापेक्षा जादा पदे रिक्त असणारे जिल्हे 
पालघर-1519, यवतमाळ-1406, नाशिक-1280, पुणे-1215, नांदेड-1197, जालना-1125.

Web Title: solapur news zp teacher recruitment