खरे दोषी कोण...परीक्षा विभागाचा तपास 'सायबर'कडे वर्ग 

तात्या लांडगे
बुधवार, 15 जानेवारी 2020

  • सोलापूर विद्यापीठाकडे सर्व्हर अन्‌ हार्डडिस्कची मागणी 
  • निकालामुळे विद्यापीठाने मागितली आठ दिवसांची मुदत 
  • सर्व्हर लॅबला कुलूप : प्रवेशासाठी स्वतंत्र कर्मचारी अन्‌ नोंदवही 
  • सायबरने नोंदवले एमकेसीएल व्यवस्थापक, परीक्षा नियंत्रक व सिस्टिम ऍनालसिस प्रमुखाचा जबाब 

चौकशीनंतर मागितला राज्यपालांनी अहवाल : दोषींवर थेट बडतर्फीचीच कारवाई 

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा बनावट लॉगिन आयडी तयार करून सोलापुरातील वि. गु. शिवदारे फार्मसी महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण वाढवून उत्तीर्ण केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास आता सायबर क्राइमकडे वर्ग करण्यात आला असून सायबर तज्ज्ञांनी विद्यापीठातील सर्व्हर लॅबची पाहणी केली. चौकशीसाठी सर्व्हर व हार्डडिस्कची मागणी करण्यात आली असून निकालामुळे विद्यापीठाने आठ दिवसांची मुदत मागितली आहे. महाराष्ट्र राज्यातील ही पहिलीच घटना सोलापूर विद्यापीठात घडली आहे. 

हेही आवश्‍य वाचा : खरचं का...बाजार समित्यांमधील शेतकरी मतदानाचा निर्णय रद्द ! 

अभ्यास दौऱ्यानिमित्त सातत्याने परदेश दौऱ्यावर असलेल्या कुलगुरू डॉ. फडणवीस यांना अंधारात ठेवून विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी कुलगुरूंच्या नावे बनावट लॉगिन आयडी तयार केला. त्या काळात कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्याकडे परीक्षा विभागाचा पदभार होता. त्यांच्या लॉगिन आयडीचा वापर करून वि. गु. शिवदारे फार्मसी महाविद्यालयातील सुमारे 15 विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना उत्तीर्ण केल्याचा प्रकार सत्यशोधन समितीच्या चौकशीत समोर आला. त्यानंतर सुटा संघटना, मागासवर्गीय प्राध्यापक संघटना व प्राचार्य संघटनेने कुलगुरू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन कुलगुरूंनी पोलिसांत गुन्हा नोंदविला. आता या प्रकरणाचा तपास सायबर क्राइमकडे वर्ग करण्यात आला असून चौकशीचा अहवाल थेट राज्यपालांनाच पाठविला जाणार आहे. त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाणार आहे. 

हेही आवश्‍य वाचाच : शिवसेनेचं ठरलं...आता बुथनिहाय शाखाप्रमुख अन्‌ जिल्हाप्रमुखनिहाय संपर्कप्रमुख 

सायबर लॅबमधील प्रवेशासाठी स्वतंत्र नोंदवही 
परीक्षा विभागातील गैरप्रकारांतील दोषी समोर यावेत या हेतूने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा बनावट लॉगिन आयडी तयार करून फार्मसीच्या नापास विद्यार्थ्यांना पास केल्याचा प्रकार झाला आहे. त्यानुसार आता याप्रकरणाचा तपास सायबर शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठात येऊन चौकशी केली आहे. परीक्षा विभागाच्या सर्व्हर लॅबला कुलूप लावले असून प्रवेशासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवली आहे. 
- डॉ. श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ 

हेही आवश्‍य वाचाच : सोलापूर विद्यापीठाच्या संचालक पदांकडे इच्छूकांची पाठ 

ठळक मुद्दे... 

  • लॉगिन आयडीचा वापर कोणी केला याचा सायबर तज्ज्ञांकडून कसून तपास 
  • परीक्षा विभागाच्या सर्व्हर लॅबला कुलूप : निकालापुरताच केला जातोय वापर 
  • सर्व्हर लॅबमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या नोंदीसाठी विद्यापीठाने ठेवले स्वतंत्र रजिस्टर 
  • परीक्षा विभागाचा सर्व्हर व हार्डडिस्क देण्याची केली मागणी : निकालामुळे आठ दिवसाची मुदत 
  • सायबरने नोंदवले एमकेसीएल व्यवस्थापक, परीक्षा नियंत्रक व सिस्टिम ऍनालसिस प्रमुखाचा जबाब

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Univercity Examination department examines 'cyber' classes