जिल्हाधिकाऱ्यांचा षटकार की मोहिते- पाटील नॉट आउट?

Political
Political

सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर राजकारणी. महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी सोलापूरची ओळख सांगणारे विजयसिंह मोहिते पाटील आज तांत्रिक दृष्ट्या राष्ट्रवादीत आहेत. मनाने आणि विचाराने ते भाजपसोबत आहेत. त्यांच्या परिवारातील दोन आणि त्यांच्या गटातील चार असे सहा सदस्यानी जिल्हा परिषद अध्यक्ष व  उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी केली. या सहा सदस्यांना अपात्र करायचे की नाही याबाबतचा निर्णय आज मंगळवारी दुपारी होणार आहे. बंडखोरी केली म्हणून सदस्यत्व रद्द करण्याची पहिलीच वेळ सोलापूरच्या राजकारणात घडत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या सहा सदस्यांना अपात्र करून कारवाईचा षटकार मारणार? की प्रशासनात आणि राजकारणात माहिर असलेले मोहिते-पाटील या कारवाईतून बचाव करून नॉट आउट राहणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा- कोण रोखणार सोलापुरातली गुन्हेगारी
यांनी केले विरोधात मतदारन

स्वरुपाराणी मोहिते पाटील,  शितलादेवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले मंगल वाघमोडे,  अरुण तोडकर व गणेश पाटील या माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केले. या सदस्यांना अपात्र करावे या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष तथा गटनेते बळीरामकाका साठे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे धाव घेतली आहे. काल सोमवारी तब्बल साडेचार तास या प्रकरणावर सुनावणी झाली असून आज मंगळवारी दुपारी एक वाजता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी ठेवण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात पूर्वीपासून सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील व करमाळ्याचे कै. नामदेवराव जगताप यांचे दोन गट कार्यरत राहिले आहेत. या दोन्ही गटातील सत्तासंघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. परंतु बंडखोरीला तांत्रिक कारवाईचे स्वरूप त्याकाळात मिळाले नाही. नंतरच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध कै.  प्रतापसिंह मोहिते पाटील असे दोन गट सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात कार्यरत राहिले होते. 

हेही वाचा- व्हिडिओ : शिवसेना पदाधिकाऱ्याच्या स्वागतावेळी उधळले पैसे
प्रतापसिंह मोहिते- पाटील यांच्यानंतर संजय शिंदे

कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या निधनानंतर सोलापूर जिल्ह्यातील दुसऱ्या गटाची धुरा करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी सांभाळली आहे. शिंदे विरुद्ध मोहिते पाटील हा संघर्ष देखील सोलापूर जिल्ह्याने वारंवार पाहिला आहे. या संघर्षात देखील दगाबाजी, बंडखोरीच्या  अनेक घटना घडल्या आहेत. तरीदेखील बंडखोरीच्या विरोधात प्रशासकीय कारवाईचे धाडस आजपर्यंत कोणीही दाखविले नव्हते. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यात पहिल्यांदाच बंडखोरांच्या विरोधात प्रशासकीय कारवाईचे धाडस दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. आज मंगळवारी दुपारी एक वाजता होणारी सुनावणी आणि त्यानंतर दोन वाजता होणाऱ्या विषय समिती सभापतींच्या निवडी या महत्त्वाच्या राजकीय घटना सोलापूरच्या राजकारणाला नवीन वळण व  नवीन दिशा देऊन जाण्याची शक्यता आहे. या निवडीकडे व या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो की जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये निष्ठेपेक्षा लक्ष्मी दर्शनालाच अधिक महत्त्व राहिल्याने सोलापूरच्या राजकारणात विश्वासार्हता व  निष्ठा या गोष्टी किरकोळ झाल्या आहेत. बंडखोरांच्या विरोधात कारवाई करण्याचे धाडस काँग्रेसनेही दाखवले होते. जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते संजय गायकवाड यांनी त्यांच्याच पक्षातील बंडखोर सदस्य मल्लिकार्जुन पाटील,  शीलवंती  भासगी व शिवानंद पाटील यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. सोमवारी सुनावणी होण्यापूर्वीच काँग्रेसने ही मागणी मागे घेतली  आहे. राष्ट्रवादीने दाखवलेल्या धाडसाला कसे स्वरूप मिळते?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com