म्युकरमायकोसिसच्या 16 रुग्णांनाच "जनआरोग्य'चा लाभ ! 216 पैकी 14 रुग्णांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

कोरोनाची दुसरी लाट आणि तिसऱ्या लाटेची शक्‍यता असल्याने जनआरोग्य योजनेची मुदत मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

म्युकरमायकोसिसच्या 16 रुग्णांनाच "जनआरोग्य योजने'चा लाभ !

सोलापूर : म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) आजाराचे रुग्ण वाढू लागले असून आतापर्यंत जिल्ह्यात 216 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून 51 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या आजाराच्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा (Mahatma Phule Jan Arogya Yojana) लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, एकाच रुग्णालयात या योजनेतून उपचार होत असल्याने आतापर्यंत केवळ 16 रुग्णांनाच मोफत उपचाराचा लाभ मिळाला आहे. (16 patients with mucormycosis benefited from the Mahatma Phule Jan Arogya Yojana)

मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांमधील रोगप्रतिकारक शक्‍ती कोरोनामुळे (Covid-19) कमी होऊ लागली आहे. अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांना म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. नाकातून या आजाराची सुरवात होते आणि रुग्णाला श्‍वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 14 रुग्णांचा बळी या आजाराने घेतला आहे. हा आजार जुनाच असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले. मात्र, कोरोना काळात जास्त दिवस उपचार घेतलेल्यांनी हा आजार होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून दीड लाखांचे पॅकेज दिले जात आहे. कोरोना झालेल्या रुग्णाला म्युकरमायकोसिस झाल्यास त्या रुग्णाचा कोरोनाच्या उपचारावर झालेला खर्च वजा करून दीड लाखातील उर्वरित रक्‍कम म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरली जात आहे. त्यामुळे उपचारातून बरे झालेल्यांना परदमोड करावी लागत असल्याचीही चर्चा नातेवाइकांमध्ये आहे.

कोरोनासाठी मार्च 2022 पर्यंत जनआरोग्य योजना

कोरोना झालेल्या रुग्णांना उपचाराचा खर्च भरावा लागू नये म्हणून तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेल्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार देण्याचा निर्णय झाला. सर्वच रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ दिला जात असून, आतापर्यंत जिल्ह्यातील सहा हजारांहून अधिक रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि तिसऱ्या लाटेची शक्‍यता असल्याने जनआरोग्य योजनेची मुदत मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला आहे. आतापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमधील 16 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. शहरातील यशोधरा, मार्कंडेय व अश्‍विनी ग्रामीण रुग्णालय- कुंभारी येथूनही रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

- डॉ. दीपक वाघमारे, जिल्हा समन्वयक, जनआरोग्य योजना, सोलापूर