
Mohol Crime News: टेम्पोसह 31 लाखाचे चंदन मोहोळ पोलिसांनी पकडले
मोहोळ - बेकायदा चंदन घेऊन जाणाऱ्या टेम्पोसह मोहोळ पोलिसांनी 31 लाख 39 हजार रुपयाचा माल पकडला. ही कारवाई रविवारी पहाटे पावणेचार वाजता सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी फाट्या जवळ करण्यात आली.
दरम्यान पोलीस आपल्याला पकडणार हे लक्षात येताच चालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्याने पुढचा अनर्थ टळला.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मोहोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, टेम्पो क्रमांक एम एच 04 जीएफ 1988 मधून वाफळे, ता. मोहोळ येथून टेम्पो चंदनाची लाकडे घेऊन श्रीकृष्ण बिनु दाढे, शंकर दाढे दोघे रा वाफळे व चालक विनोद खडूळ हे चंदन घेऊन निघाले आहेत.
या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना सांगितल्या नंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारुती लोंढे, पोलीस नाईक प्रवीण साठे, अमोल घोळवे, अंमलदार सिद्धू मोरे, उमेश देविदास, जयश्री गायकवाड, नानासाहेब अवघडे, हरिभाऊ आदलिंगे या कर्मचाऱ्यांचे पथक देवडी फाट्यावर रवाना केले.
दरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी देवडी फाट्यावर पहाटे पावणे चार वाजता सापळा लावला. माहिती प्रमाणे वाफळे गावावरून एक टेम्पो येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी येणाऱ्या टेम्पोस थांबण्याचा इशारा केला.
मात्र पोलीस आपल्याला हात करून थांबण्याचा इशारा करत आहेत हे लक्षात येताच, चालकाने टेम्पो वेडा वाकडा व भरधाव चालवून रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला उड्या मारून जीव वाचविला, व त्याही परिस्थितीत वाहनाचा पाठलाग सुरू केला.
टेम्पो चालकाने टेम्पो तेलंगवाडी ता मोहोळ कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला घालून गाडी थांबवुन, अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. सदरचे वाहन पोलिसांनी तपासले असता त्यात प्लॅस्टिकच्या तेरा पिशव्यात 307 किलो चंदनाची 15 लाख 38 हजार 750 रुपयाची लाकडे आढळून आली.
पोलिसांनी टेम्पो सह 31 लाख 38 हजार 750 रुपयाचा माल ताब्यात घेतला. या घटनेची नोंद मोहोळ पोलीसात करण्यात आली असुन तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.