
सोलापुरात आजीआजोबा लग्नबंधनात; 61 वर्षांचं प्रेम फुललं
सोलापुर : आपण अनेक आगळेवेगळे लग्नसोहळे पाहिले असतील पण ६१ वर्षाच्या जोडप्याचा लग्नसोहळा पार पडल्याचं आपण पहिल्यांदाच ऐकत असाल. सोलापुरात वयोवृद्ध नाना-नानीचा आगळा-वेगळा लग्नसोहळा उत्साहात पार पडला असून सोलापूर येथील बुरुड समाजाचे ज्येष्ठ नागरिक श्री. सदाशिवनाना मारुतीराव वडतिले व सौ. कुसुमनानी यांच्या लग्नाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्यांचा शाही लग्नसोहळा बुधवारी केगाव येथे मोठ्या थाटामाटात व आगळ्या -वेगळ्या पद्धतीने पार पडला. तसेच श्री.सदाशिवनाना यांच्या वयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त साखरतुला करुन 61 किलो साखर समाजबांधवांना वाटण्यात आली. डोळ्याचे पारणे फेडणारा कार्यक्रम पाहण्यासाठी केगावच्या माळरानावर पाचशेहून अधिक समाजबांधवांनी हजेरी लावली होती.
(60 Year Old Couple Marriage In Solapur)
सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष व पत्रकार दशरथ वडतिले यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सोलापूरच्या बुरुड समाजात पहिल्यांदाच सोहळा झाला व कमालीच्या उत्साहात पार पडला. सकाळी 9 वाजता अतिउत्साही नवरा-नवरींना हळद लावण्यात आली, त्यानंतर कारमधून नवरदेवाच्या पारण्याची वरात काढण्यात आली, बँडच्या तालावर नाचताना वऱ्हाडी मंडळीसह नवरा-नवरी बेधुंद झाली होती, त्यांचा हा नाच बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. प्रवेशद्वारापासून नवरा-नवरी हे एका मोटारसायकलीवरून व्यासपीठापर्यत पोहोचले.
हेही वाचा: जैसे ज्याचे कर्म तैसे...; प्रियसीचा खून करून मृतदेह पुरताना प्रियकराचा मृत्यू
त्रीपीस सुटा-बुटातील नवरा व नऊवारी काष्टा साडीतील नवरी व त्यांचा मेकअप याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते व त्यांना बांधण्यात आलेल्या मुंडावळ्या फारच शोभून दिसत होत्या. तेथे नवरदेव सदाशिवनानांची साखरतुला करण्यात आली, त्यानंतर सर्वश्री दशरथ वडतिले, सूर्यकांत शेंद्रे, रमेश शेंद्रे, सौ.मंदा गोळसंगी, सौ.दर्शना सावंत यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. श्री. विठ्ठल साळुंके यांनी सूत्रसंचालन केले तर कु. मयुरी गोळसंगी हिने आभार मानले. शेवटी लग्नविधी व मंगलाआष्टके झाली, त्यानंतर एकीकडे नवरा-नवरीला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती तर दुसरीकडे वऱ्हाडी मंडळी मिष्ठांनावर ताव मारताना दिसत होती. तेथून जाताना मात्र सर्वामध्ये एकच चर्चा होती की, अग्गोबाई कार्यक्रम लईच भारी झाला बघा... एकदम झकास...अगदी एक नंबरच.....!
हा देखणा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री दशरथ वडतिले, सूर्यकांत शेंद्रे, ज्ञानेश्वर सुरवसे, रामचंद्र जतकर, विठ्ठल साळुंके, मारुती साळुंके, किसन वडतिले, राहुल वडतिले, बसवराज गोळसंगी, पद्माकर सावंत, राजू वडतिले, सौ.मंदा गोळसंगी, सौ.दर्शना सावंत, माया सावंत, सौ.सरस्वती वडतिले, सौ.रेणुका वडतिले, सौ.पुष्पा वडतिले, सौ.सविता वडतिले, सौ.दुर्गा सुरवसे व कु.मयुरी गोळसंगी यांनी विशेष परिश्रम घेतले.
हेही वाचा: 'उद्धवा दिलेली स्क्रिप्ट नीट पाठांतर कर'; भाजपनं पवारांसोबत शेअर केलं व्यंगचित्र
हुंडा देऊन लग्न केले नि जावई सासरवाडीत स्थिरावला
सदाशिवनाना यांचे लग्न 6जून 1972 साली सोलापूरच्या वारद चाळीत झाले, त्यावेळी त्यांनी सासरे जगन्नाथ सुरवसे यांना तीनशे रुपये हुंडा दिला होता. लग्नासाठी सनई तर भोजनात खिरीचा बेत होता. नानांचे आजोळ इंडीचे असले तरी त्यांचा जन्म कल्याणचा आहे, सातवीपर्यत शिक्षण घेतलेल्या नानांनी 40 वर्षे कल्याण महापालिकेत सेवक म्हणून काम केले. त्यानंतर ते सोलापुरात राहण्यास आले. त्यांच्या पत्नी कुसुमनानी यांचे शिक्षण पहिली इयत्तेपर्यत झाले आहे. सुखी व समाधानी जीवन जगणाऱ्या नाना-नानींना दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे व परतूंडे असा मोठा परिवार आहे.
Web Title: 60 Year Old Couple Marriage In Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..