Solapur : बहुपीक पद्धतीने तीन गुंठ्यात ७५ प्रकारची पिके; हवामान बदलाला तोंड देण्यासाठी खैरेवाडीच्या भांगे यांचा प्रयोग

शेतकऱ्यांना बहुपीक पद्धतीमुळे कमी जोखमीत अधिकाधिक उत्पन्न घेत नैसर्गिक अन्ननिर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग खैरवाडी (ता. माढा) येथील शेतकरी गुरू भांगे यांनी केला आहे.
75 types of crops multi-crop method
75 types of crops multi-crop methodSakal

सोलापूर : सध्या सर्वच शेतकऱ्यांना हवामान बदलाचा मोठा फटका सोसावा लागत आहे. मागील काही वर्षांत शेती करणे हे शेतकऱ्यांसाठी नुकसानीचेच ठरले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बहुपीक पद्धतीमुळे कमी जोखमीत अधिकाधिक उत्पन्न घेत नैसर्गिक अन्ननिर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग खैरवाडी (ता. माढा) येथील शेतकरी गुरू भांगे यांनी केला आहे. त्यांनी तीन गुंठे मॉडेल शेतीवर ७५ प्रकारची पिके घेतली आहेत.

गुरू भांगे यांची शेजारील विठ्ठलवाडी हद्दीत त्यांची तीन एकर शेती आहे, या शेतातच ते राहतात. त्यांना फक्त तीन एकर शेती आहे. मात्र, या शेतीच्या उत्पन्नावर ते सुखी समाधानी आहेत, कारण त्यांनी यशस्वी सेंद्रिय शेती केली आहे.

त्यांच्या तीन गुंठे सेंद्रिय शेती मॉडेलने आजवर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार झाडेही निसर्गतः एकमेकांच्या सहकार्याने वाढत असतात. जमिनीमध्ये यांच्या मुळ्या एकमेकांना क्रॉस झाल्याने तसेच एका पिकाने उत्सर्जित केलेले घटकद्रव्य दुसऱ्या पिकांचे अन्न असल्याने कमीत कमी क्षेत्रात नैसर्गिक पद्धतीने अधिकाधिक उत्पन्न घेता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

त्यांनी २०१० पासून रासायनिक खते व औषधे यांना फाटा दिला आहे. दोन देशी गायींच्या शेणापासून तयार केलेल्या जिवामृत, गांडूळखत, गोकृपाअमृत यांचा वापर ते करतात.

तीन गुंठ्यातील विविध पिके

आंबा, सीताफळ, चिक्कू, पेरू, जांभूळ, आवळा, केळी आदी १७ प्रकारची फळझाडे, पालक, शेपू, देशी वांगे, घेवडा, दुधी भोपळा, घोसावळे, टोमॅटो, मिरची आदी तीस प्रकारच्या भाज्या, अक्कलकारा, तुळशीचे चार प्रकार, पुदीना,

कोरफड, गुंजपाला आदी १९ प्रकारच्या औषधी वनस्पती, बांबूची दोन बेट, अशोक, लिंबोरा, देवसावर, हशी आदी प्रकारची वनझाडे व तुळजापुरी, झेंडू, मधुमालती, मोगरा, निशिगंध, जास्वंद, लिली अशी १८ प्रकराची फुलझाडे त्यांनी तीन गुंठे जमिनी लावली आहेत.

ठळक बाबी

  • कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क

  • घराजवळ व शेतात चारशे पेक्षा अधिक झाडे

  • २५० पेक्षा जास्त पक्ष्यांचा घराभोवती कायम अधिवास

  • विविध प्रकारच्या पक्ष्यांमुळे नैसर्गिक कीड नियंत्रण

  • बांधाभोवती ८०० फूट लांब साग व शेवगा वृक्षांची वनभिंत

निसर्गपूरक शेती ही काळाची गरज असून, पर्यावरण संवर्धन झाले तरच मनुष्य जात वाचू शकणार आहे. यासाठी रसायनमुक्त शेती करून विषमुक्त अन्न तयार करणे, ही काळाची गरज आहे.

- गुरू भांगे, शेतकरी, खैरेवाडी, ता. माढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com