esakal | शोध मोहिमेत सापडला पंढरपूर तालुक्‍यात बोगस डॉक्‍टर ! गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

शोध मोहिमेत सापडला पंढरपूर तालुक्‍यात बोगस डॉक्‍टर ! गुन्हा दाखल

कोणतीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता पंढरपूर तालुक्‍यातील तुंगत या गावामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्‍टरवर कारवाई करण्यात आली आहे.

शोध मोहिमेत सापडला पंढरपूर तालुक्‍यात बोगस डॉक्‍टर! गुन्हा दाखल

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोणतीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता पंढरपूर तालुक्‍यातील (Pandharpur Taluka) तुंगत या गावामध्ये वैद्यकीय व्यवसाय (Medical Profession) करणाऱ्या बोगस डॉक्‍टरवर (Doctor) कारवाई करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले (Dr. Eknath Bodhale) यांनी दिली आहे. जिल्ह्यात अधिकृत वैद्यकीय परवान्याशिवाय उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्‍टरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी दिले आहेत. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी यांची समिती असून, या समितीकडून बोगस डॉक्‍टरांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

या मोहिमेत तालुक्‍यातील तुंगत गावामध्ये एसटी बस स्टॉपजवळ पत्र्याच्या खोलीत रॉय बिवास बिरेन (वय 38, रा. घाट पातली, ता. वनगाव, जि. चोवीस परगाना, पश्‍चिम बंगाल) हा बोगस डॉक्‍टर वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आला. समितीकडून दवाखान्याची तपासणी केली असता मिळालेल्या औषध व बिलांनुसार तो ऍलोपॅथीचा व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. रॉय बिवास बिरेन याच्याकडे शैक्षणिक पात्रता व वैद्यकीय नोंदणीकृत प्रमाणपत्र नसल्यामुळे मेडिकल प्रॅक्‍टिशनर ऍक्‍ट 1961 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती डॉ. बोधले यांनी दिली.

हेही वाचा: राज्यात 'या' दिवसापासून सुरू होईल कोरोनाची तिसरी लाट !

वैद्यकीय शिक्षण नसल्याने बोगस डॉक्‍टरांकडून रुग्णांना हानीकारक औषधे दिली जातात. त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सामान्य नागरिकांना बोगस डॉक्‍टर कसा ओळखावा, याचे पुरेसे ज्ञान नसल्याने बोगस डॉक्‍टरकडून होणाऱ्या लुटीला त्यांना बळी पडावे लागते. याबाबत रुग्णांनी संबंधित डॉक्‍टरांच्या पदवीची माहिती घ्यावी. त्याबाबत काही शंका आल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.

यासंदर्भात तहसीलदार सुशील बेल्हेकर म्हणाले, तालुक्‍यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाबरोबरच, डेंग्यू, चिकुन गुनियासारख्या आजारांच्या नियंत्रणासाठी प्रशासन व आरोग्य विभागाकडून आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच बोगस वैद्यकीय व्यवसाय चालवणाऱ्यांकडून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे तालुक्‍यातील सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयाच्या दर्शनी भागावर बोगस डॉक्‍टरांविषयी तक्रार कोणाकडे करावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्याचे नाव, पद व दूरध्वनी क्रमांकाचा फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

loading image
go to top