esakal | संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत आज भाविकांची गर्दी !
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत आज भाविकांची गर्दी !

sakal_logo
By
राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा

जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंढरपूर शहर व लगतच्या नऊ गावांमध्ये रविवारपासून (ता. 18) संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंढरपूर शहर व लगतच्या नऊ गावांमध्ये रविवारपासून (ता. 18) संचारबंदी (Curfew) लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे श्री विठ्ठल मंदिर बंद असले तरी नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी पंढरीत (Pandharpur) शनिवारी भाविकांनी गर्दी केली होती. (A crowd of devotees gathered in Pandharpur today against the backdrop of curfew-ssd73)

हेही वाचा: आमदार प्रणिती शिंदेंविरोधात गुन्हा! "हे' आहे खरे कारण

कोरोना महामारीमुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी यात्रा सोहळा प्रतीकात्मक स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. यात्रा सोहळ्यादरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून 18 ते 25 जुलै या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट व सर्व घाट आणि मंदिर परिसरामध्ये 18 जुलै सकाळी सहा वाजल्यापासून ते 25 जुलै सायंकाळी चार वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर पंढरपूर शहरालगतच्या भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, कोर्टी, गादेगाव, वाखरी, शिरढोण व कौठाळी या नऊ गावांमध्ये 18 जुलै रोजी सकाळी 6 ते 22 जुलै सकाळी सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर पंढरपूर शहर व गोपाळपूरमध्ये 18 जुलै रोजी सकाळी सहापासून ते 24 जुलै सायंकाळी चार वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा: लोकगीतातील शिंदेशाही

पंढरपूर शहरामध्ये रविवारपासून संचारबंदी असल्यामुळे परगावच्या भाविकांनी शनिवारी मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती. श्री विठ्ठल मंदिर बंद असल्यामुळे श्री संत नामदेव पायरीचे दर्शन घेत भाविकांनी समाधान मानले. यासंदर्भात श्री अशोक किसनराव तमकर (रा. कनिफनाथ वाडी, ता. पाथर्डी, जि. नगर) हे "सकाळ'शी बोलताना म्हणाले, मागील वर्षी आषाढी व कार्तिकी यात्रा रद्द झाल्याने पंढरीला येता आले नाही. उद्यापासून पंढरपुरात संचारबंदी असल्याने आजच पंढरीत दाखल झालो आणि चंद्रभागेचे व नामदेव पायरीचे दर्शन घेऊन धन्य झालो.

आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिस प्रशासनाच्या वतीने त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात आली आहे. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंढरपूर शहर व परिसरात बारा ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रे उभारण्यात आली आहेत. चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी भाविकांना मज्जाव करण्यात आला असून नदी तीरावरील सर्व घाटांवर बॅरिकेड लावून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

loading image