esakal | "या' रुग्णालयात होतेय ऑक्‍सिजनची चाळीस टक्के बचत ! रिझर्वायर बॅंगसह नॉन रीब्रिदिंग मास्कचा वापर

बोलून बातमी शोधा

Non-Breathing Mask
"या' रुग्णालयात होतेय ऑक्‍सिजनची चाळीस टक्के बचत ! रिझर्वायर बॅंगसह नॉन रीब्रिदिंग मास्कचा वापर
sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : एकीकडे ऑक्‍सिजनचा तुटवडा आणि दुसरीकडे क्षमतेच्या दुपटीपेक्षा जास्त रुग्ण, अशा परिस्थितीत येथील उपजिल्हा रुग्णालयाने गंभीर रुग्णांच्या शिवाय अन्य रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवठा करताना रिझर्वायर बॅंगसह नॉन रिब्रिदिंग मास्कचा वापर सुरू केला आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद गिराम आणि त्यांच्या टीमने अशा पद्धतीने सुमारे चाळीस टक्के ऑक्‍सिजनची बचत करण्यात यश मिळवले आहे.

पंढरपूर शहर आणि तालुक्‍यातील कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. कोव्हिड डेडिकेटेड हॉस्पिटलमधून क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करून लोकांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालयात देखील क्षमतेच्या दुपटीपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील सर्व यंत्रणा रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी अहोरात्र धावपळ करत आहे. एकीकडे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना ऑक्‍सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. खासगी हॉस्पिटल्स जादा दराने ऑक्‍सिजन घेऊ शकतात. परंतु, उपजिल्हा रुग्णालयासारख्या रुग्णालयांना जादा दराने ऑक्‍सिजन विकत घेता येत नाही. अशा परिस्थितीत उपलब्ध होणाऱ्या ऑक्‍सिजनचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर कसा करता येईल, याचा विचार अधीक्षक डॉ. अरविंद गिराम आणि त्यांच्या टीमने केला.

हेही वाचा: आमदार निधीला आचारसंहितेचा अडथळा ! राज्याच्या तिजोरीत खडखडाट; चारऐवजी दोन कोटीच मिळणार

व्हेंटिलेटर किंवा बायपॅप मशिनचा वापर करावा लागत नसलेल्या (हाय रिस्क) रुग्णांना नॉन रिब्रिदिंग मास्क आणि रिझर्वायर बॅंगचा वापर करण्यास त्यांनी सुरवात केली आहे. या पद्धतीमुळे सुमारे 40 टक्के ऑक्‍सिजनची बचत होऊ लागली आहे. त्यामुळे रुग्णालयाचे डॉ. गिराम आणि त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी या पद्धतीची दखल घेतली असून अन्य हॉस्पिटलना अशा पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

अशी केली ऑक्‍सिजन बचत...

या संदर्भात डॉ. गिराम म्हणाले, आम्ही नवीन काही केलेले नाही. फक्त उपलब्ध ऑक्‍सिजनचा काटकसरीने वापर कसा करता येईल याचा बारकाईने विचार केला. पंधरा दिवसांपूर्वी सुरवातीस काही रुग्णांना वापर केला आणि त्याचे रिझल्ट पाहून आता गंभीर नसलेल्या रुग्णांना या पद्धतीने ऑक्‍सिजन पुरवठा करत आहोत. मास्क सोबतची नॉन रिब्रिदिंग बॅग जी आहे त्या बॅगमध्ये दोन व्हॉल्व्ह असतात. ज्याच्यामुळे जेव्हा उच्छ्वास सोडला जातो, त्या वेळी ती हवा बाहेर सोडून दिली जाते. जेव्हा रुग्णाकडून परत श्वास घेतला जातो तेव्हा त्यास शुद्ध ऑक्‍सिजन मिळतो. या मास्कचे वैशिष्ट्य असे आहे, की 75 ते 85 टक्के एवढी त्यातून ऑक्‍सिजन डिलिव्हरी होते. त्यामुळे रुग्णाची ऑक्‍सिजन लेव्हल पटकन वर येते आणि त्याची ऑक्‍सिजनची मागणी कमी होते. ज्या रुग्णास पाच ते सहा लिटर प्रतिमिनिटे ऑक्‍सिजन लागत होता, तो या पद्धतीमुळे तीन ते चार लिटर पुरतो आहे. त्यामुळे आमच्या हॉस्पिटलचा विचार करता सुमारे 40 टक्के ऑक्‍सिजनची बचत झाली आहे. बचत करणे म्हणजे ऑक्‍सिजन निर्माण करण्यासारखेच आहे.