esakal | Solapur : सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उसाचा झाला पत्रा! ऊस गळीत हंगाम लांबणार?
sakal

बोलून बातमी शोधा

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उसाचा झाला पत्रा! ऊस गळीत हंगाम लांबणार?

गेल्या दोन दिवसांपूर्वीच्या सोसाट्याच्या वाऱ्याने उसाचा पत्रा झाला आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उसाचा झाला पत्रा! ऊस गळीत हंगाम लांबणार?

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : तालुक्‍यात हस्त नक्षत्राच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच्या सोसाट्याच्या वाऱ्याने उसाचा (Sugarcane) पत्रा झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उसातील पाणीच न हटल्यामुळे उसाजवळून जाताना गटारीसारखी दुर्गंधी येत आहे. कांदा नासला तर भीज पावसामुळे घरांची पडझड झाली. मोहोळ तालुक्‍यातील (Mohol Taluka) दोन गावांत अंगावर वीज पडून एक दुभती गाय व म्हशीचा मृत्यू झाला. या अडचणीमुळे यंदाचा ऊस गळीत हंगाम लांबण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा: सोलापुरात गांधीजींची कॉंग्रेस हायंच कुठं..?

आषाढ महिन्यापासून मोहोळ तालुक्‍यात अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे आषाढातच विहिरी तोंडाला आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे, परंतु बुडातील ओलच न हटल्याने कांदाही नासला आहे. नवीन लागवडीच्या उसाच्या सऱ्या सारख्याच पाण्याने भरलेल्या असल्याने उसाला फुटलेले लहान कोंबही नष्ट होऊ लागले आहेत. फळबागांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. फळबागेचे क्षेत्र सारखे ओले असल्याने पाने पिवळी पडून गळू लागली आहेत. मेघगर्जनेमुळे अंगावर वीज पडून कोन्हेरी येथील प्रकाश तूपसौंदर यांच्या मालकीची दुभती गाय मृत्युमुखी पडली तर सौंदणे येथील ताज शेख यांची म्हैस मृत्युमुखी पडली.

हेही वाचा: अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले!

उसाच्या फडात सारखेच पाणी असल्याने ऊस हा एक शेवडी जाऊन वजनात मोठी घट येण्याची शक्‍यता आहे. ऊस गळीत हंगाम आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक कारखान्यांच्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या कारखान्यावर दाखल झाल्या आहेत. उसाच्या फडातील पाणी न हटल्याने ऊस बाहेर कसा काढावा, अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. ऊस तोडणी कामगार व ट्रॅक्‍टर मालकांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली तरच हंगाम व्यवस्थित पार पडेल. प्रशासकीय पातळीवर नुकसानीच्या पंचनाम्याची प्रकीया सुरू झाली असून, पाण्यामुळे पंचनामा करण्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे उशीर लागणार आहे. दरम्यान, वापसा न आल्याने व जमिनीची मेहनत करता येत नसल्याने रब्बी हंगामातील पेरण्याही लांबण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

loading image
go to top