esakal | सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याने सराफा बाजाराला आली झळाळी | Gold Market News
sakal

बोलून बातमी शोधा

gold silver

कोरोनाच्या तडाख्यातून सावरलेला सराफा बाजार आता पूर्ववत तेजीत येऊ लागला आहे.

सोने-चांदीच्या दरात घसरण! सराफा बाजाराला आली झळाळी

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) तडाख्यातून सावरलेला सराफा बाजार आता पूर्ववत तेजीत येऊ लागला आहे. मागील पितृ पंधरवड्यातही सराफा बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. सोने (Gold) - चांदीच्या (Silver) भावात घसरण झाल्याने ग्राहकही गुंतवणूक म्हणून सोने- चांदी खरेदीसाठी बाजारात गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. नवरात्रोत्सव (Navratri Festival) अन्‌ दसरा सणामुळे सराफा बाजार आणखीन झळाळणार आहे.

मागील दीड वर्षापासून सोने-चांदी खरेदी बाजार ठप्प होता. तरीही वर्षभर सोने-चांदीच्या दरात वाढ होत होती. सोन्याच्या किमती 55 हजारावर गेल्या होत्या. चांदीच्या दरामध्येही 68 हजार प्रतिकिलोपर्यंत वाढ झाली होती. मात्र एक आठवड्यापूर्वी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सतत घसरण होत आहे. सोन्यामध्ये दोन महिन्यांपूर्वी आणि आताच्या दरामध्ये प्रतितोळा जवळपास तीन हजार रुपयांचा फरक आहे. तर चांदीचे दर तब्बल पाच हजारांनी कमी झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत सोने खरेदीकडे पाठ फिरवलेल्या ग्राहकांनी पुन्हा सोने खरेदीसाठी पसंती दाखवली आहे.

हेही वाचा: नवरात्रोत्सवात रूपाभवानी मंदिरात 'असे' होणार धार्मिक कार्यक्रम

लग्नसराईमध्येही कोरोनाचे नियम होते. आता कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाली आहे. त्यामुळे लग्नाची तयारी व सोने खरेदी धूमधडाक्‍यात करण्यात येत आहे. सोने खरेदीलाही दिवसेंदिवस ग्राहकांची पसंती मिळत आहे. जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील सोलापूर शहरामध्ये सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहक येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. नेहमी पितृपक्षामध्ये नवीन खरेदी केली जात नव्हती. पण यंदा सोन्याच्या किमती कमी झाल्याने या संधीचा फायदा ग्राहक घेत असल्याचे चित्र सध्या शहरातील सर्व सराफा दुकानांतील ग्राहकांच्या गर्दीवरून पहायला मिळत आहे.

40 ते 50 टक्‍क्‍यांनी वाढली खरेदी

कोरोनामुळे बंद पडलेल्या सराफा व्यवसायाला पितृपक्षात गती मिळाली आहे. किमती कमी झाल्यामुळे व्यवसायाला पुन्हा उभारी मिळाली आहे. ग्राहकांनी पितृपक्षातही सोने- चांदी खरेदी केली. नवरात्रोत्सवामध्ये ही खरेदी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. सध्या 40 ते 50 टक्‍क्‍यांनी सराफा व्यवसाय वाढला आहे.

75 टक्के ग्राहक ग्रामीण भागातील

सोलापूर शहरातील विविध सराफा दुकानांमध्ये सोने-चांदी खरेदी करण्यासाठी 75 टक्के ग्राहक हे ग्रामीण भागातील शेतकरी येत आहेत. त्याचबरोबर उर्वरित 25 टक्के ग्राहक हे शहरी भागातील असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतीचे उत्पन्न मिळाल्यानंतर शेतकरी आपल्या क्षमतेनुसार सर्वात जास्त गुंतवणूक सोने खरेदीमध्ये करीत आहेत. शहरामध्ये मराठवाडा, विजयपूर, गुलबर्गा, मोडनिंब येथील सर्वात जास्त ग्राहक सोने-चांदी खरेदीसाठी येत आहेत.

आकडे बोलतात

  • सोने 10 ग्रॅम : 47 हजार 100 रुपये

  • चांदी प्रतिकिलो : 61 हजार 700 रुपये

हेही वाचा: अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले!

कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून व्यवसाय ठप्प होता. मात्र सोने-चांदीचे भाव कमी झाल्याने पितृपक्षात खरेदी वाढली आहे. आगामी दसरा आणि दिवाळीत आणखी खरेदी वाढण्याची दाट शक्‍यता आहे.

- सिद्धाराम शिंगारे, उपाध्यक्ष, सोलापूर सराफा व्यापारी संघ

लोकांमधील कोरोनाची भीती कमी झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी वाढली आहे. दसरा, दिवाळीची ऍडव्हान्स खरेदी आणि बुकिंग केली जात आहे. दर कमी झाल्याचा अंदाज घेत ग्राहक सोने- चांदीची बुकिंग करीत आहेत.

- सुरेश बिटला, बिटला ज्वेलर्स

सोने- चांदीचे दर वाढले होते, तेव्हा खरेदी करणेदेखील कठीण होते. मात्र आता दर कमी झाल्याने सोने खरेदी सोपे झाले आहे. कोरोना काळात विवाह सोहळे न झाल्याने खरेदी करता आली नाही. आता मात्र दसरा- दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर दर कमी झाले आहेत. ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब आहे.

- सीमा सुरवसे, गृहिणी

कोरोनाच्या काळात सोन्याचा दर पन्नास हजारापार गेला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करणे आवाक्‍याबाहेरचे होते. आता मागील काही महिन्यांपासून सोन्याचे दर कमी होत असल्याने ग्राहकांमधून खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.

- सुषमा कुलकर्णी, गृहिणी

loading image
go to top