जेव्हा मध्यरात्री बंद घरातून येतो चित्रविचित्र आवाज, तेव्हा..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेव्हा मध्यरात्री बंद घरातून येतो चित्रविचित्र आवाज, तेव्हा..!
जेव्हा मध्यरात्री बंद घरातून येतो चित्रविचित्र आवाज, तेव्हा..!

जेव्हा मध्यरात्री बंद घरातून येतो चित्रविचित्र आवाज, तेव्हा..!

सोलापूर : येथील कुमठा नाका परिसरात रेणुका देवी अपार्टमेंट, दुसरा मजला, घर नंबर 201 हे गेल्या 13 वर्षांपासून बंद आहे. इतकी वर्षे शांत असलेल्या या घराच्या एका खोलीतून मात्र मागील दोन- तीन दिवसांपासून रात्री फुस्स, शुकशुक, सिरसिर असे मानवी मात्र भयानक (Horror Sound) वाटावे, असे आवाज ऐकू येत होते. शेजारील लोक भयभीत झाले होते. कोणी म्हणाले बंद घरावर भूतांनी (Ghost) कब्जा केला आहे, तर कोणी म्हणाले घरात सापांचा (Snakes) वावर आहे. आवाज फक्त रात्रीच्या वेळीच ऐकू येतो. रात्री बारानंतर (Midnight) आवाजाची तीव्रता वाढत असे.

हेही वाचा: सोशल मीडियावर चुकीचे काही टाकू नका! सोलापुरातील युवक जेरबंद

शेवटी शेजारील लोकांनी ही घटना पोलिसांना कळवली. पोलिस आले, घराला कुलूप असल्याने आतून पाहणी करता आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कुलूप तोडून पाहणी करण्याचे ठरले. घटनेची माहिती वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य सिद्धेश्वर मिसालोलू व गणेश तुपदोळे यांना समजली. रात्रीच्या वेळी दोघे घटनास्थळी पोचले. थांबून थांबून विचित्र आवाज ऐकू येत होते. घोणस किंवा नाग सापाचे आवाज असावेत, असे समजून त्यांनी आवाज रेकॉर्ड केला. हा आवाज रेकॉर्ड त्यांनी वन्यजीव प्रेमी मुकुंद शेटे यांना पाठविले. मुकुंद शेटे यांनी आवाज व्यवस्थित ऐकून आवाजामागील कारण सांगितले.

असे उकलले आवाजाचे गूढ

फुस्स, शुकशुक, सिरसिर असे मानवी वाटावे असे आवाज कोणाचे आहेत, याचा शोध घेताना मुकुंद शेटे यांनी काही निरीक्षण नोंदवले. घराच्या खिडक्‍या उघड्या आहेत का पाहण्यास सांगितले. दुसऱ्या मजल्यावरून मिसालोलू व तुपदोळे यांनी खाली उतरून पाहणी केली तेव्हा सर्व खिडक्‍या बंद होत्या. परंतु मागील बाजूस असणाऱ्या बाथरूमची खिडकी काच फुटलेली दिसत होती. मागील भाग खूपच अडचणीचा होता व झाडी वाढल्याने जाता येत नव्हते. लांबून स्टॉर्च खिडकीत मारले असता खिडकीतून दोन गव्हाणी घुबड दिसून आले. शेजारील सर्वांची भीती काही क्षणात पळून गेली. सर्वांच्या चेहऱ्यावर हासू आले.

हेही वाचा: ...मात्र कंगनाच्या वक्तव्याचा निषेध : पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे

गव्हाणी घुबडाची वैशिष्ट्ये

भारतात सर्वत्र आढणारे घुबड, पांढरट फिक्कट राखाडी रंगाचे घुबड. चेहरा बदाम (दिल) आकाराचा दिसतो. सुंदर घुबड म्हणून ओळखले जाते. जुने वाडे, किल्ले, पडकी घरे, बंद घरे अपार्टमेंटमध्ये आपली घरटी बनवितात. नर- मादी दोघे मिळून पिल्लांचे संगोपन करतात. एक घुबड एका रात्री पाच ते सहा उंदीर मारून खाते. पिल्लांच्या संगोपनावेळी एक गव्हाणी जोडी एका रात्रीत दहा ते पंधरा उंदीर मारतात, म्हणून यास शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाते.

loading image
go to top