चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केला डोक्‍यात पाटा घालून पतीचा खून! खडकी येथील घटना | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केला डोक्‍यात पाटा घालून पतीचा खून! खडकी येथील घटना

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केला डोक्‍यात पाटा घालून पतीचा खून!

करमाळा (सोलापूर) : पतीवरील चारित्र्याच्या संशायवरून राहत्या घरामध्ये डोक्‍यात दगडी पाटा घालून पत्नीने पतीचा खून (Crime) केल्याची धक्कादायक घटना खडकी (ता. करमाळा) (Karmala) येथे घडली आहे. सुदाम श्‍यामराव गायकवाड (वय 52, रा. खडकी, ता. करमाळा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयित आरोपी पत्नी सुनीता सुदाम गायकवाड हिला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा: 'एसटी'च्या विलिनीकरणासाठी शेतकऱ्याचे सोलापूर ते तुळजापूर दंडवत!

करमाळा तालुक्‍यात याच महिन्यात झालेला हा दुसरा खून आहे. भिलारवाडी येथील खुनानंतर हा दुसरा खून झाला आहे. यामध्ये संशयित आरोपी पत्नी सुनीता सुदाम गायकवाड हिच्या विरुद्ध कलम 302 प्रमाणे करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुदाम गायकवाड याचा भाऊ रावसाहेब श्‍यामराव गायकवाड (वय 42, रा. खडकी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, सुदामची पत्नी नेहमी त्याच्यावर संशय घ्यायची. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे व्हायची. रविवारी (ता. 21) सकाळी आठ वाजता मोठ्या भावाच्या घरी काही तरी झाल्याचे समजले. त्यानंतर आम्ही सुदामच्या घरी गेलो. तेव्हा सुदाम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या तोंडावर गंभीर दुखापत झालेली होती. घरा समोरील बाजूचा आतमधून दरवाजा बंद तर मागील दरवाजास बाहेरून कुलूप होते.

हेही वाचा: 'विठ्ठल' निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी मेळाव्याला आले महत्त्व

त्याला रुग्णवाहिकेतून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. त्यानंतर सुदामच्या पत्नीला विचारले तेव्हा 'मीच दगडी पाटा तोंडावर मारून त्यास जीवे ठार मारले आहे' असे सांगितले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिने असे का केले, याबाबत विचारले तेव्हा ती गप्प राहिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

loading image
go to top