esakal | "उजनी'च्या पाण्यावरून पेटणार सोलापूर-इंदापूर नवा वाद?

बोलून बातमी शोधा

Ujani Dam
"उजनी'च्या पाण्यावरून पेटणार सोलापूर-इंदापूर नवा वाद?
sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : उजनी धरणातील पाणी वाटपावरून आधीच मराठवाडा विरुद्ध सोलापूर यांच्यात रणकंदन सुरू असतानाच, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍याला देण्याची प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आहे. त्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भूमिकेविषयी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध राजकीय पक्षांनी देखील इंदापूरला पाणी देण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यावरून सोलापूर विरुद्ध इंदापूर असा नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा नीरा उजव्या कालव्याचे पंढरपूर, सांगोला तालुक्‍यासाठी मंजूर असलेलं पाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ता येताच रद्द करून ते पुन्हा बारामतीकडे वळवलं. अशातच आता उजनी धरणातून इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांसाठी उपसा सिंचन योजनेसाठी पाच टीएमसी पाणी देण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भूमिकेला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरू केला आहे.

हेही वाचा: Video : नव्वदी पार केलेल्या आजीने केली कोरोनावर मात अन्‌ कोराईगड केला काबीज !

दोन दिवसांपासून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होऊ लागली आहे. ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमांचे दहन करून निषेधही व्यक्त केला जात आहे. याच घटनेचा निषेध म्हणून करमाळा तालुक्‍यातील शेतकरी आणि महिलांनी पालकमंत्र्यांच्या प्रतिमेला उजनीच्या पाण्यात जलसमाधी दिली. त्यानंतर रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील उजनीतून इंदापूर तालुक्‍याला पाणी देण्यास विरोध केला आहे.

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी अशी ओळख असलेल्या उजनी धरणातून सोलापूर शहरासह जिल्ह्यातील शेतीला पाणी दिले जाते. परंतु आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तहान भागण्यापूर्वीच उजनीतील पाण्याची पळवापळवी सुरू झाली आहे. उजनी धरणातून मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोळेगाव बंधाऱ्यात उजनी धरणातून पाणी दिले जाते. धरणाच्या निर्मितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे योगदान मोठं आहे. अनेक शेतकऱ्यांची घरंदारं याच धरणात गेली आहेत. असे असतानाही अनेक लाभार्थी शेतकरी आजही उजनी धरणातील हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत. अजूनही शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचले नाही.

हेही वाचा: "दोन डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका नाहीच ! कोरोना झाल्यानंतरही होत नाही रुग्ण गंभीर'

सततच्या दुष्काळामुळे दरवर्षी धरणातील पाणी पातळी कमी होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना व येथील लोकांना पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागते. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था येथील शेतकऱ्यांची आहे. असं असतानाही उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍याला देण्याचा घाट सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घातला आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यावरून राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता आहे.