पेपर बुडालेल्या विद्यार्थ्यांची ‘विशेष परीक्षा’!शिक्षकेतर कर्मचारी ‘कामबंद’वर ठाम; ‘कंत्राटी’वर परीक्षा सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exam
पेपर बुडालेल्या विद्यार्थ्यांची ‘विशेष परीक्षा’!शिक्षकेतर कर्मचारी ‘कामबंद’वर ठाम; ‘कंत्राटी’वर परीक्षा सुरु

पेपर बुडालेल्या विद्यार्थ्यांची ‘विशेष परीक्षा’!शिक्षकेतर कर्मचारी ‘कामबंद’वर ठाम; ‘कंत्राटी’वर परीक्षा सुरु

सोलापूर : विद्यापीठ व उच्च महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे स्थगित केलेली परीक्षा सोमवारपासून (ता. ६) सुरळीत सुरु झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने परीक्षा सुरू केली आहे पण, ज्यांना पेपर देता आला नाही, त्यांची मार्चअखेरीस स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार आहे. पण, त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला त्याची माहिती विद्यापीठाला देणे आवश्यक असणार आहे. तर २ ते ५ या काळातील रद्द झालेली परीक्षा त्या कोर्सच्या शेवटच्या पेपरनंतर घेतली जाणार आहे.

सातवा वेतन आयोगाचा फरक द्यावा, राहिलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तो वेतन आयोग लागू करावा, रिक्तपदे तातडीने भरावीत, अशा विविध मागण्यांसाठी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांना शासनाकडून केवळ आश्वासनच मिळाल्याने आता ठोस कार्यवाही झाल्याशिवाय माघार नाही, अशी त्यांची भूमिका आहे.

परंतु, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा फेब्रुवारीत होत असल्याने आणखी विलंब विद्यार्थीहिताच्या दृष्टीने चिंतेचा ठरू शकतो म्हणून विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन परीक्षेची जबाबदारी त्या त्या महाविद्यालयांवर सोपवली. त्याला प्राचार्यांनी अनुमती दिल्यानंतर रखडलेली परीक्षा पुन्हा सुरु झाली. अनुभवी कर्मचारी नसल्याने काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोचायला १०-१५ मिनिटांचा विलंब झाला, पण तेवढाच वेळ विद्यार्थ्यांना वाढवूनही देण्यात आला. परीक्षा सुरळीत सुरु झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

परीक्षेला विलंब; वेळ वाढवून देण्याची नामुष्की

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा जिल्ह्यातील ६२ केंद्रांवर सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असतानाही पर्यायी उपाययोजना करून सुरळीत परीक्षा घेण्याचा ही कदाचित पहिलीच घटना असावी. पण, सोमवारी काही परीक्षा केंद्रांवर शिक्षकेतर कर्मचारी कमी पडले. संबंधित प्राचार्यांनी विद्यापीठाला कळविल्याने तत्काळ त्याठिकाणी विद्यापीठातील ३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पाठवले. त्यामुळे अक्कलकोट, शिवाजी रात्र महाविद्यालयासह अन्य केंद्रांवर परीक्षेला अर्ध्या तासापर्यंत विलंब झाला. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्याची नामुष्की ओढावली.

पेपर बुडालेल्यांची स्पेशल एक्झाम

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरुच असल्याने पर्यायी उपाययोजना करून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने परीक्षा सुरु करण्यात आली. सोमवारी (ता. ६) काही ठिकाणी प्रश्नपत्रिका विलंबाने पोचली, पण त्यांना वेळ वाढवून देण्यात आला. ज्यांचे पेपर बुडाले त्यांची ‘स्पेशल परीक्षा’ घेतली जाईल.

- डॉ. शिवकुमार गणपूर, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सोलापूर विद्यापीठ