‘ती’च्या चोरीसाठी ‘ती’लाच केले जाते बंद

सांगोला तालुक्‍यात काळ्या सोन्याच्या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष
Administration neglect Illegal sand stealth Sangola city illicit trade in black gold solapur
Administration neglect Illegal sand stealth Sangola city illicit trade in black gold solapursakal

सांगोला : आपले अवैद्य काम लक्षात येऊ नये यासाठी कोण, कशी शक्कल लढवेल हे सांगता येत नाही. सांगोला शहरात आणलेली अवैद्य वाळू बांधकामाच्या ठिकाणी जाऊन खाली करण्यासाठी चक्क त्या भागातील विजेचा ट्रांसफार्मर बंद केला जातो. याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. सांगोला तालुक्‍यात ‘वाळू चोरी जोमात, प्रशासन मात्र कोमात’ असल्याने काळ्या सोन्याच्या अवैद्य व्यवसायाकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.सांगोला तालुक्‍यातून मान, अप्रुफा, बेलवण, कोरडा अशा नद्या जातात.

या नद्यापात्रातून तालुक्‍यातील अवैद्य वाळू उपसा जोरात सुरू आहे. नदीकाठच्या परिसरातून अवैद्य वाळू उपसा करून बांधकामाच्या ठिकाणी पोहोच करण्याची एक मोठी साखळीच दररोज या कामात व्यस्त असताना दिसून येते. मध्यरात्रीपासून पहाटेच्या सुमारापर्यंत ठराविक ठिकाणाहून वाळू बांधकामापर्यंत पोहोच करण्याची वाहने वेगाने व राजरोसपणे तालुक्‍यात सुरू आहे. अवैद्य वाळू उपशामुळे नदीमध्ये अनेक ठिकाणी खड्डेही पडलेले दिसून येतात.या अवैद्य वाळू उपशावर लक्ष देणे गरजेचे असताना सध्या कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. कारवाईसंदर्भात छोटी मोठी कारवाईची प्रकरणे सोडली तर याकडे अर्थपूर्ण व्यवहारच कारणीभूत आहे की काय? अशी शंका सर्वसामान्यांना होत असते. या अवैध वाळू उपसा शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाबरोबरच सामान्य नागरिकांनीही जागृत राहणे गरजेचे आहे.

दिवसा कारवाई, रात्री ढिलाई

सध्या मार्चएंडमुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक पोलिस कारवाई करताना दिसून येत आहेत. दिवसा साध्या मोटरसायकलपासून इतर अनेक वाहनांवर वाहतुकीचे नियम दाखविणारे पोलिस, मात्र रात्रीच्या वेळी बिगर नंबर प्लेटवाल्या गाड्या वेगाने जात असताना याकडे दुर्लक्ष करीत असतात. वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे पहाटेच्या वेळी रस्त्यांवरून व्यायामासाठी फिरणारे अनेक नागरिकही अपघातामुळे फिरण्याचे बंद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांची ’दिवसा कारवाई, रात्री ढिलाई’ असे चित्र सध्या दिसून येत आहे.

काळ्या सोन्याने वाढली मुजोरी

या नद्यांचा पात्रातून ‘काळ्या सोन्याने’ अनेकांची इच्छापूर्ती होत आहे. अल्पकालावधीत कमी श्रमात मोठी माया गोळा करण्याचा व्यवसाय म्हणून वाळू व्यवसायाकडे सध्या पाहिले जात आहे. या व्यवसायात तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे. या व्यवसायामुळे तरुणाईमध्ये मुजोरी वाढली असून अनेक वेळा भांडण-तंटेही होतात. अधिकाऱ्यांनी कारवाई केलेल्या वाहनांना पळवून नेण्याबरोबरच कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणे, त्यांच्यासमोरुन गाड्या पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे एकंदरीत काळ्या सोन्याच्या अवैद्य वाहतुकीमुळे तालुक्‍यात मुजोरी वाढल्याचे दिसून येते. याला वेळीच आवर घालणे महत्वाचे आहे.

सुंदर कार्यालयाबरोबरच लोकप्रिय प्रशासन हवे

सध्या महसूल विभागामध्ये ‘सुंदर माझे कार्यालय’ हे अभियान सुरू आहे. कार्यालय स्वच्छ व सुंदर असणे ही काळाची गरज आहेच, परंतु, त्या सुंदर कार्यालयामध्ये चालणारे प्रशासनही लोकप्रिय व्हायला हवे. त्यामुळे तालुक्‍यातील अवैध वाळू व्यवसाय असो किंवा इतर अनेक नागरिकांना भेडसावणारे प्रश्‍न असो यामध्ये सुधारणा होणे हेही गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com