२ वर्षांनंतर ZP शाळांमध्ये रंगणार मैदानी खेळ! नाश्‍त्याऐवजी मिळेल जेवण; १०० रुपये प्रवास खर्च

कोरोनानंतर पहिल्यांदाच १५ डिसेंबरपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहेत. शाळा, केंद्र, बीट, तालुका व जिल्हा असे एकूण पाच स्तरांवर या स्पर्धा होणार आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती.
Kho Kho sports
Kho Kho sportssakal

सोलापूर : कोरोनानंतर पहिल्यांदाच १५ डिसेंबरपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहेत. शाळा, केंद्र, बीट, तालुका व जिल्हा असे एकूण पाच स्तरांवर या स्पर्धा होणार आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने कोरोनानंतर पहिल्यांदाच शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा घ्यायला मान्यता दिली आहे. शालेय स्तरावरूनच विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, हा त्यामागील हेतू असतो. जिल्ह्यात दोन हजार ७९५ जिल्हा परिषदेच्या शाळा असून, त्याअंतर्गत दोन लाख ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या आवडीनुसार क्रीडा प्रकार निश्चित करून स्पर्धेत भाग घेता येणार आहे. कोरोना काळात शाळा बंद, मुले घरी आणि ऑनलाइन शिक्षण, याचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. लठ्ठपणा, दृष्टिदोष, चिडचिडेपणा वाढल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात असून, पालकांनी आपल्या मुलांना क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. शाळा स्तरावर १५, १६ डिसेंबर, केंद्र स्तरावर २० व २१ डिसेंबर, बीट स्तरावर २६, २७ डिसेंबर आणि तालुका स्तरावरील स्पर्धा ३० व ३१ डिसेंबर या काळात होतील. शेवटी १ ते १५ जानेवारी या काळात जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. त्यासंबंधीचे नियोजन सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडतील.

क्रीडा स्पर्धेत ‘या’ खेळांचा समावेश

  • लंगडी

  • कबड्डी

  • खो-खो

  • १०० व २०० मीटर धावणे

  • बुद्धिबळ

आठवड्याला खेळाच्या ४ तासिकांचे बंधन

विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक आठवड्यातील चार तासिका खेळाच्या घ्यायला हव्यात. विद्यार्थ्यांची खिलाडू वृत्ती जोपासली जावी, सांघिक भावनांची जाणीव व्हावी आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, या हेतूने प्रत्येक शाळेने दररोज किंवा आठवड्यातील चार तासिका खेळासाठी द्याव्यात. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी त्यासंबंधीचे निर्देश शाळांना दिले आहेत. त्यानुसार अंमलबजावणी करणे मुख्याध्यापकांना बंधनकारक असणार आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली १५ डिसेंबर २०२२ ते १५ जानेवारी २०२३ या काळात प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. यंदा जिल्हा स्तरावरील स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० रुपयांचा प्रवास खर्च दिला जाणार आहे. त्या विद्यार्थ्यांना यंदा नाश्त्याऐवजी जेवण मिळणार आहे.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com