'आम्ही जातो आमुच्या गावा, पंढरीनाथा आमचा निरोप घ्यावा!' | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'आम्ही जातो आमुच्या गावा, पंढरीनाथा आमचा निरोप घ्यावा!'
'आम्ही जातो आमुच्या गावा, पंढरीनाथा आमचा निरोप घ्यावा!'

'आम्ही जातो आमुच्या गावा, पंढरीनाथा आमचा निरोप घ्यावा!'

sakal_logo
By
राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कार्तिकी यात्रेदरम्यान (Kartiki Yatra) चंद्रभागा नदी स्नान (Chandrabhaga River) व श्री विठ्ठलाचे मुखदर्शन (Shri Vitthal - Rukmini Temple) घेऊन तृप्त झालेले भाविक जड अंत:करणाने आपापल्या गावी परतू लागले आहेत. मंगळवारी द्वादशीच्या दिवशी 'आम्ही जातो आमुच्या गावा, पंढरीनाथा आमचा निरोप घ्यावा' अशी भावना व्यक्त करीत भाविकांनी पंढरीतील (Pandharpur) बस व रेल्वे स्थानकावर परतीच्या प्रवासासाठी गर्दी केली होती.

हेही वाचा: माजी आमदारांमध्ये 'यांना' मिळतेय सर्वाधिक पेन्शन! कोण आहेत टॉपवर?

कार्तिकी यात्रेदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने यंदा कार्तिकी यात्रेला भाविकांची अपेक्षित गर्दी होऊ शकली नाही. तरीदेखील यात्रेला सुमारे दोन ते तीन लाख भाविक खासगी वाहने, ट्रॅव्हल बसेस व रेल्वेने पंढरीत दाखल झाले होते. यात्रेला आलेल्या भाविकांना यंदा श्री विठ्ठलाच्या पददर्शनाऐवजी मुखदर्शनावर समाधान मानावे लागले. कार्तिकी एकादशी दिवशी चंद्रभागा नदीत स्नान केल्यानंतर श्री विठ्ठलाचे मुखदर्शन झाल्यानंतर भाविकांना परतीचे वेध लागले आहेत.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने यात्रेला आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता राज्य परिवहन विभागाने येथील बस स्थानकावर खासगी वाहने व स्कूल बसेस तैनात केल्या आहेत. त्यामुळे भाविकांचा परतीचा मार्ग सुकर झाला आहे. भाविकांच्या सेवेसाठी सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, सातारा व लातूर येथील परिवहन विभागाचे सुमारे 12 अधिकाऱ्यांचे पथक अहोरात्र कार्यरत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असणाऱ्या या पथकामध्ये वाहन निरीक्षक महेश रायबान, सुखदेव पाटील, संदीप शिंदे, शिवाजी सोनटक्के, रमेश पाटील, नीता शिबे, संदीप भोसले, गौस शेख, संजय आडे आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात्रा कालावधीत सुमारे पंधरा हजार भाविकांना कोणतेही अधिकचे शुल्क न आकारता एसटी तिकिटाच्या दरामध्ये परत जाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. याबाबत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे 'सकाळ' शी बोलताना म्हणाले, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पंढरपूर परिसरातील शिक्षण संस्थांनी आपल्या स्कूल बसेस देऊन मोलाचे सहकार्य केले आहे. खासगी वाहन व बस चालकांनी भाविकांकडून जादा भाडे घेऊ नये याकरिता 'स्पेशल स्क्वाड'ची नेमणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने भाविकांसाठी 'यात्रा स्पेशल' रेल्वे गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये पंढरपूर- निजामाबाद, पंढरपूर- लातूर, पंढरपूर- मिरज, पंढरपूर- नांदेड, पंढरपूर- बिदर, पंढरपूर- आदिलाबाद आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील भाविक रेल्वेने आपापल्या गावी परतू लागले आहेत. याबाबत प्रकाश पटोकार (रा. उरळ, ता. बाळापूर, जि. अकोला) म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने यंदा आम्ही यात्रेला येऊ शकतो का नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र धनबाद - कोल्हापूर रेल्वेने आम्ही यात्रेसाठी पंढरपूरला आलो होतो. परतीच्या प्रवासासाठी आम्ही रेल्वेनेच जात आहोत.

loading image
go to top