esakal | Success Story : पतीच्या निधनानंतर खचून न जाता केला मुलाला फौजदार!
sakal

बोलून बातमी शोधा

पतीच्या निधनानंतर खचून न जाता केले मुलाला फौजदार!

पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर, कुटुंबप्रमुख असलेल्या सासऱ्यांचे देखील अकाली निधन झाले अन्‌ काही वर्षांतच होत्याचे नव्हते झाले.

पतीच्या निधनानंतर खचून न जाता केला मुलाला फौजदार!

sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर, कुटुंबप्रमुख असलेल्या सासऱ्यांचे देखील अकाली निधन झाले अन्‌ काही वर्षांतच होत्याचे नव्हते झाले. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली होती. त्यात माहेरची परिस्थिती देखील बेताची असताना, पडत्या काळात भावाने दिलेल्या पाठिंब्यामुळे, परिस्थितीचा बाऊ न करता प्रतिकूल परिस्थितीत मुलाला उच्च शिक्षण देत पोलिस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) करणाऱ्या उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील राजश्री बाळासाहेब देशमुख (Rajshri Deshmukh) यांचा संघर्षमय प्रवास...

हेही वाचा: पवारांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला धक्का! सुशीलकुमार शिंदे म्हणाले...

सासर - माहेर गावातीलच. माहेरची परिस्थिती तशी बेताची होती. त्यामानाने सासरची स्थिती तशी चांगली होती. संसार गुण्यागोविंदाने सुरू होता. परंतु कुणाची तरी नजर लागावी म्हणतात ना तशी अचानक परिस्थिती निर्माण झाली. पतीचे अचानक अपघाती निधन झाले. त्यामुळे कुटुंबाचा सर्व भार सासरे रावसाहेब देशमुख यांच्यावर पडला. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पतीच्या दुःखातून सावरतो न्‌ सावरतो तोपर्यंत सासऱ्यांचे देखील अकाली निधन झाले. त्यामुळे राजश्री देशमुख यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. अमित, अजय व प्रियंका ही तिन्ही मुले लहान होती. त्यामुळे या मुलांच्या भविष्याचे काय, असा मोठा प्रश्न पडला होता. कारण, घरातील कर्ती व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबाची काय अवस्था असते, हे फक्त त्या कुटुंबालाच माहीत. नियतीचे आघातावर आघात सुरूच होते. त्यात घरची परिस्थिती देखील हलाखीची होत चालली. अशा पडत्या काळात भाऊ शरद पाटील यांनी मोठी साथ दिली. भावाच्या घरची परिस्थिती तर पूर्वीपासूनच बेताची असताना देखील अशा स्थितीत बहिणीच्या कुटुंबाला हातभार लावत भावाने मदत केली.

हेही वाचा: भाजप सरकार निगरगट्ट, क्रूर व शेमलेस : प्रणिती शिंदे

मुले शाळेत हुशार असल्याने, त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी राजश्री यांची धडपड असायची. त्यामुळे सासरे व पतीच्या निधनानंतर दुःखातून सावरत, आपली मुले हीच आता आपलं सर्वस्व असून, आता जे करायचे ते त्यांच्यासाठी, अशी खूणगाठ मनाशी बांधून, आलेल्या आर्थिक संकटांचा सामना करत स्वतः शेतीत लक्ष घालून चांगल्या प्रकारे शेती करत मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे केले. थोरला मुलगा अमितने आईला कष्टाचा आणखी भार पडू नये म्हणून डिप्लोमा पूर्ण करून तातडीने नोकरी स्वीकारली. परंतु या काळात राजश्री यांचा भाचा स्वप्नील पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमितने नोकरीचा राजीनामा देत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला अन्‌ पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेत यश संपादन केले. अमितच्या यशाने राजश्री यांच्या कष्टाचे चीज झाले असून, या संघर्षाच्या काळात भाऊ शरद पाटील, भाचा स्वप्नील पाटील, दीर रमेश देशमुख यांचे पाठबळ त्यांना मिळाले.

loading image
go to top