esakal | शरद पवारांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला धक्का! आता सुशीलकुमार शिंदे म्हणाले... | Political News
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवारांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला धक्का! आता सुशीलकुमार शिंदे म्हणाले...

जे आमचे नव्हतेच त्यांच्या पक्षांतराने काही फरक पडणार नाही, असे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले आहे.

पवारांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला धक्का! सुशीलकुमार शिंदे म्हणाले...

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कॉंग्रेसचे (Congress) माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांनी कॉंग्रेसला हात दाखवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) घड्याळ हाती बांधले. मात्र, खरटमल हे पूर्वीच पक्षापासून दूर गेले होते तर चंदेले यांनी पक्षाचे काम सोडले होते. त्यामुळे जे आमचे नव्हतेच त्यांच्या पक्षांतराने काही फरक पडणार नाही, असे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले आहे.

हेही वाचा: उजनी धरण फुल्ल ! भीमा नदीत 30 हजार क्‍युसेकचा विसर्ग

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. वास्तविक पाहता पाच वर्षे सरकार टिकावे म्हणून तिन्ही पक्षातील नाराजांना एकमेकांच्या पक्षात घेऊ नये, असा अलिखित प्रोटोकॉल तयार झाला. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तो प्रोटोकॉल बाजूला ठेवला जात असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाल्यानंतर जिल्हाप्रमुख, महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद देऊनही पक्षांतर्गत वादामुळे महेश कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. तांत्रिक अडचणीमुळे अजूनही त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालेला नाही.

दरम्यान, कॉंग्रेसमध्ये असताना आपल्यासोबत काम केलेल्या आणि सध्या कॉंग्रेस नेतृत्वावर नाराज असलेल्यांना राष्ट्रवादीत आणण्यात महेश कोठे हे यशस्वी ठरले आहेत. महापालिका निवडणुकीची धुरा कोठेंवर सोपविण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता "राधाश्री'वरून राष्ट्रवादीच्या घड्याळातील काट्यांची हालचाल होणार हे निश्‍चित मानले जात आहे.

प्रणितीताई, शहराकडे लक्ष द्या!

2019 च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना पराभूत करून विजयाची हॅट्ट्रिक करण्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी यश मिळविले. परंतु, शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत अन्य मतदारसंघांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. सत्तेतील कॉंग्रेस महापालिका निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिली. आता कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा म्हणून काम करताना त्यांना सातत्याने राज्यभर दौरे करावे लागत आहेत. सोलापुरात आल्यानंतर ठराविक पदाधिकाऱ्यांचाच गराडा त्यांच्याभोवती असल्याने पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचीही ओरड ऐकायला मिळते. दुसरीकडे, त्या नाराजांची मनधरणी करणारा दुसरा तगडा नेता कॉंग्रेसमध्ये नसल्याने पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचेही बोलले जात आहे.

...आता कॉंग्रेस बस्स! भाजपमधील नाराजांना शोधा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस, शिवसेनेतील नाराज नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यात महेश कोठेंचा मोठा वाटा असल्याचे पाहायला मिळाले. कॉंग्रेस व शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांसह नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आगामी काळात आणखी काही मोठे नेते येतील, असे कोठेंनी पवार यांना सांगितले. त्यावेळी शरद पवार यांनी, आता कॉंग्रेस व इतर मित्रपक्षातील नेत्यांपेक्षा भाजपमधील नाराजांना शोधा, असा सल्ला कोठेंना दिल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: बार्शी पोलिस ठाणे आवारातच अल्पवयीन मुलास ठार मारण्याचा प्रयत्न!

अ‍ॅड. बेरियांची भूमिका काय?

माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांचे आणि माझे 37 वर्षांचे जुने संबंध आहेत. त्यांच्या स्वाक्षरीने मी महापौर झालो, दोनदा पक्षनेताही झालो. यापूर्वी त्यांच्याच स्वाक्षरीने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी व्हायच्या. त्यामुळे ते मला आजही नावासह ओळखतात. महेश कोठे यांनी मला त्या ठिकाणी जेवणाचे निमंत्रण दिल्याने मी गेलो होतो. अजून मी पक्षांतर करण्याचे ठरवले नसून पुढे काही निर्णय घेतल्यास तो जाहीर करेन, अशी भूमिका अ‍ॅड. यू. एन. बेरिया यांनी "सकाळ'च्या माध्यमातून मांडली.

loading image
go to top