esakal | Maharashtra Bandh : भाजप सरकार निगरगट्ट, क्रूर व शेमलेस : प्रणिती शिंदे; सोलापुरात 'बंद'ला संमिश्र प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप सरकार निगरगट्ट, क्रूर व शेमलेस : प्रणिती शिंदे

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

भाजप सरकार निगरगट्ट, क्रूर व शेमलेस : प्रणिती शिंदे

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे दहा दिवसांपूर्वी अत्यंत क्रूर अशी घटना घडली. शेतकऱ्यांना चिरडलं गेलं. जेव्हा प्रियांका गांधी-वढेरा (Priyanka Gandhi-Vadhera) व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा त्यांना तेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं. मोदी सरकारच्या (Modi Government) डोक्‍यात सत्तेची हवा गेली आहे. त्यांना वाटतं, की आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही. निगरगट्ट, क्रूर व हम करेसो कायदा व शेमलेस अशी त्यांची मानसिकता झाली आहे. सत्तेत आहोत आम्ही काहीही करू शकतो, महिला व दलितांवर अत्याचार केलं तरी आमचं कोणी काही करू शकत नाही, आम्ही शेतकऱ्यांना चिरडलं तरी आम्हाला कोणी हात लावू शकत नाही, अशी मानसिकता मोदी सरकारची झाली आहे. अशा मानसिकतेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारलं आहे. मोदी सरकारच्या अहंकाराचा लवकरच अंत होईल, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी मोदी सरकारवर केली.

हेही वाचा: पवारांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला धक्का! सुशीलकुमार शिंदे म्हणाले...

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांनी पुकारलेल्या बंदला सोलापूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद येथील पूनम गेटवर धरणे आंदोलन केले. या वेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह तिन्ही पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, नवी पेठ परिसरातील दुकाने बंद होती. मात्र, पूर्वभागातील दुकाने व बाजारपेठाही सुरळीत सुरू आहेत. अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील यंत्रमाग व इतर उद्योग सुरू असून, अपवाद वगळता काही यंत्रमाग व उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. बहुतेक करून रस्त्यावरील उद्योग बंद व एमआयडीसीच्या आतील उद्योग सुरू, असा प्रकार अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे सुरू आहे. सोलापूर बाजार समितीत सर्व व्यवहारही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. बंदच्या पार्श्‍वभूमीवर विडी कारखानदारांनी महिला कामगारांच्या सुरक्षेच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वीच कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता व त्यामुळे शहरातील सर्व विडी कारखाने बंद होते.

दरम्यान, महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद येथील पूनम गेटवर धरणे आंदोलन केले. या वेळी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर पोलिस व्हॅनमधून महिलांनी "मोदी सरकार हाय हाय', "मोदी सरकारचा धिक्कार असो' अशा घोषणा दिल्या.

हेही वाचा: उजनी जलाशयाच्या प्रदूषणात भर घालतेय जलपर्णी !

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षानेही (माकप) बंदची हाक दिली होती. त्यामुळे माकपच्या कार्यकर्त्यांना सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम हे आंदोलनासाठी पूनम गेट निघाले असताना, पूनम गेटवरील माकपच्या कार्यकर्त्यांना नरसय्या आडम आंदोलनस्थळी पोचण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरुद्ध घोषणा देऊन उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला.

loading image
go to top