विद्यापीठात अहिल्यादेवींचे 45 फुटी स्मारक! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार भूमिपूजनाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 solapur university

स्मारकाचा संपूर्ण खर्च विद्यापीठाकडे तर सुशोभिकरणाचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे.

सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचे 45 फुटी स्मारक!

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे स्मारक उत्तराभिमुख होणार असून ते नवीन प्रशासकीय इमारतीसमोर उभारले जाणार आहे. स्मारकाची उंची 45 फुटांपर्यंत असणार आहे. स्मारकाचा संपूर्ण खर्च विद्यापीठाकडे तर सुशोभिकरणाचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे. या स्मारकासाठी अंदाजित नऊ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. भूमिपूजनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले जाणार आहे.

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे नाव दिल्यानंतर विद्यापीठ परिसरात त्यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी पुढे आली. त्याला प्रतिसाद देत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निधी देण्याचे जाहीर केले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती स्थापन केली. आश्‍वारुढ पुतळा बसविण्याच्या निर्णयात बदल करून शिवलिंग हाती घेतलेले स्मारक उभारण्याचा निर्णय या नवीन समितीने घेतला. त्यानुसार आता कृती आराखडा तयार करण्यात आला असून स्मारक कसे असेल, याची माहिती नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आली. बैठकीतील सूचनांनुसार स्मारक हे दर्जेदार असणार आहे.

हेही वाचा: सोलापूर विद्यापीठ नामविस्तारासाठी 523 निवेदने

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन ते स्मारक दिसायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्मारक 45 फुटांपर्यंत उंच असल्याने निश्‍चितपणे महामार्गावरुन ये-जा करणाऱ्यांना दिसेल, असा विश्‍वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्‍त केला आहे. तत्पूर्वी, दिल्लीचा लालकिल्ला, आग्रा येथील ताजमहल, ग्वाल्हेरचा किल्ला, याची पाहणी करून त्या धर्तीवर हे स्मारक होईल, असा विश्‍वास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी सांगितले. पिवळा (येलो), सोनेरी (गोल्डन) की लाल (रेड) रंगाचे दगड वापरायचे, यावर विद्यापीठाची बांधकाम समिती निर्णय घेईल. या समितीच्या प्रस्तावाला व्यवस्थापन समितीची मान्यता लागणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरु होणार आहे.

हेही वाचा: परीक्षा न दिलेल्यांना पुन्हा मिळणार संधी! सोलापूर विद्यापीठ

विद्यापीठाकडे नाहीत तेवढे पैसे

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे विद्यापीठासमोरील स्मारकासाठी विद्यापीठाला किमान दोन कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. मात्र, विद्यापीठाकडे तेवढी रक्‍कम उपलब्ध होणे कठीण आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीतून तो निधी मिळावा, अशी मागणी विद्यापीठाने केली आहे. अजूनपर्यंत विद्यापीठाच्या मागणीचा विचार झाला नसून विद्यापीठ प्रशासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न कायम असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, स्मारकाची देखभाल-दुरुस्ती, त्याठिकाणी होणाऱ्या अध्यासन केंद्राची व्यवस्था, यासाठीही मोठा निधी लागणार आहे. त्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासन गप्पच आहे.

loading image
go to top