esakal | पोलिसांनी लावला अवघ्या सात दिवसांत दरोड्यातील आरोपींचा छडा !
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

पोलिसांनी लावला अवघ्या सात दिवसांत दरोड्यातील आरोपींचा छडा !

sakal_logo
By
चेतन जाधव

पाच अनोळखी आरोपींनी टेम्पोसमोर कार आडवी लावून टेम्पोच्या कॅबीनमधील चालकाच्या चेहऱ्यावर चटणी पावडर टाकली.

अक्कलकोट (सोलापूर) : पाच अनोळखी आरोपींनी (Criminals) टेम्पोसमोर कार आडवी लावून टेम्पोच्या कॅबीनमधील चालकाच्या चेहऱ्यावर चटणी पावडर टाकली. गळ्यास चाकू लावून व चाकूचा धाक दाखवून मारहाण करून फिर्यादीचे रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरून नेलेल्या पाच आरोपींपैकी दोघांना अवघ्या सात दिवसांत कर्नाटक राज्यातून पकडण्यात अक्कलकोट उत्तर ठाण्याच्या पोलिसांना यश आले. (Akkalkot police caught the absconding robbers in just seven days-ssd73)

हेही वाचा: आषाढी कालावधीमधील संचारबंदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, या घटनेची फिर्याद सिराज सैपन तांबोळी (वय 34, रा. चुंगी, ता. अक्कलकोट, सध्या राहणार, कण्णीनगर, सोलापूर) यांनी दिली होती. या दरोड्यातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे लक्ष्मण सिधप्पा गवंडी (वय 35, रा. निलोगी, ता. जेवरगी), इमाम हुसेनसाब जमादार (वय 27, रा. निलोगी, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा) असे आहे. हा दरोडा दिनांक 3 जुलै रोजी रात्री 11.45 च्या सुमारास सांगवी कॉर्नरजवळ घालण्यात आला होता. यामध्ये पाच संशयित आरोपी कारमध्ये येऊन टेंपोसमोर कार आडवी लावून टेम्पोच्या कॅबीनमध्ये येऊन चटणी पावडर चेहऱ्यावर टाकून, गळ्यास चाकू लावून व चाकूचा धाक दाखवून मारहाण केली व फिर्यादीची रोख रक्कम 12 हजार व मोबाईल 15 हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले.

हेही वाचा: आमदार प्रणिती शिंदे यांना मिळणार मंत्रिपद !

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र राठोड यांच्याकडे देण्यात आला होता. तपासादरम्यान त्यांनी सराईत गुन्हेगार, पारधी वस्ती तसेच कर्नाटक शेजारील पोलिस ठाण्याकडील सराईत गुन्हेगार यांची माहिती घेऊन तपास केला. तसेच रात्रीच्या वेळी संशयित वाहन चेक केले. रात्रगस्त नाकाबंदी दरम्यान या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार (क्र. केए-32 डी 6179) ही मैंदर्गी नाका, अक्कलकोट येथे संशयितरीत्या मिळाली. या वाहनातील चालकाकडे सखोल चौकशी केली असता हे वाहन वरील गुन्ह्यात वापरल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता दोन तपास पथके तयार करण्यात आली. एक पथक आळंद, गुलबर्गा तर दुसरे पथक आलमेल, जेवरगी या भागात पाठवून गुन्ह्यातील आरोपींचे मोबाईल लोकेशन सायबरच्या माध्यमातून वेळोवेळी घेऊन यातील गुन्ह्यातील दोन आरोपींचा शोध घेऊन तेथून ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन, रोख रक्कम व मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, गुन्ह्यातील इतर तीन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute), अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे (Upper Superintendent of Police Atul Zende), उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड (Sub-Divisional Police Officer Dr. Santosh Gaikwad) व पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र राठोड, पो.ना. महादेव चिंचोळकर, पो.ना. असिफ शेख, पो.कॉ. प्रमोद शिंपाळे, गजानन गायकवाड, अशपाक मियॉंवाले, चिदानंद उपाध्ये, अंबादास कोल्हे यांनी केली.

loading image