Alliance Air : सोलापुरात विमानसेवेसाठी अलाइन्स एअरची तयारी

होटगी रस्ता विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी 'अलाइन्स एअर’ या कंपनीने विमानतळाचा अभ्यास सुरू केला आहे.
Alliance Air
Alliance Airsakal

- प्रमिला चोरगी

सोलापूर - होटगी रस्ता विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी 'अलाइन्स एअर’ या कंपनीने विमानतळाचा अभ्यास सुरू केला आहे. त्यामध्ये होटगी रस्ता विमानतळाच्या उभारणीपासून ते दरम्यानच्या काळात विमानसेवा दिलेली किंगफिशर कंपनी, त्याला मिळालेला प्रतिसाद, सध्याच्या रन-वेची स्थिती, विमातळावर असलेल्या सुविधा, कोणत्या प्रकारची विमाने उतरू शकतात, चिमणी पाडल्यानंतरही असलेले इतर अडथळे याची माहिती अलाइन्स एअर’ घेत आहे.

केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेपूर्वी किंगफिशर कंपनीने या विमानतळावरून ७२ सीटर प्रवासी विमान सेवा सुरू केली होती. अलाइन्स एअर देखील ७० सीटर विमानसेवा देते. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत होटगी रस्ता विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. २०१५ पासून विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला.

केंद्रीय विमान प्राधिकरणाच्या पथकाने २०१७ त्यानंतर २०१९ असे दोन वेळा विमानतळ परिसर आणि श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची पाहणी करून छोट्या-मोठ्या १०६ अडथळे नोंदविले गेले होते. या अडथळ्यांच्या यादीमध्ये श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी मुख्य अडथळा असल्याचे सांगितले.

श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याने सात वर्ष न्यायालयीन लढा दिल्यानंतर तीन महिन्यापूर्वी चिमणी पाडण्यात आली. त्यानंतर विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली शासनस्तरावरून सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान विमानसेवेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उच्च दाबाच्या विजेच्या तारा, ६२ एकरावर झालेली अतिक्रमण आदी अडथळ्यांवर चर्चा झाली. त्यानंतर विमानतळावरील सुविधा, रन-वे स्थिती यावर केंद्रीय विमान प्राधिकरणाची बैठक झाली.

या बैठकीत विमानतळाच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी आवश्यक विकास आराखडा तयार केला. चिमणी पाडल्यानंतर या तीन महिन्याच्या कालावधीत एकाही विमान कंपनीने विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळ परिसराची पाहणी केली नाही. मात्र महिन्याभरात विमानतळावरील सुविधांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू होताच, अलाइन्स एअर या कंपनीने विमानसेवेसाठी अभ्यास सुरू केला आहे.

याचा अहवाल तयार होण्यास दोन महिन्याचा कालावधी लागणार असून, तो अहवाल डीजीसीएकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतरच होटगी रस्ता विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार की नाही, याची दिशा स्पष्ट होणार आहे.

ठळक घडामोडी

- होटगी रस्ता विमानतळ व्यवस्थापकाने केंद्रीय प्राधिकरणाकडे दोन महिन्यापूर्वी तपशील पाठवला

- केंद्रीय प्राधिकरणाने हा तपशील इच्छुक विमान कंपन्यांना पाठविला

- इच्छुक विमानकंपन्यांमध्ये जेट एअरवेज, अलाइन्स एअर या दोन कंपनीचा समावेश होता

- जेट एअरवेज कंपनीने नकार दिला असून, अलाइन्स एअर कंपनीने अभ्यास सुरू केला आहे

- अभ्यासातून अंतिम अहवाल तयार होण्यास लागणार दोन महिने लागणार

होटगी रस्ता विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय स्तरावरून हालचाली सुरू आहेत. या विमानतळावर आवश्यक सोयी-सुविधा देण्याकरिता येत्या महिन्यात निविदा प्रक्रिया होईल. निविदा प्रक्रियेनंतर काम पूर्ण होण्यास सहा महिन्याचा कालावधी लागेल. तसेच विमानतळावरून विमानसेवा देण्यासाठी जेटएअरवेज आणि अलाइन्स एअर या कंपन्यांनी सकारात्मकता दर्शविली होती. त्यात अलाइन्स एअरने अभ्यास सुरू केला आहे. विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

- बनोत चापला, व्यवस्थापक, होटगी रस्ता विमानतळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com