esakal | Navratrotsav : यावर्षी नवरात्र आठच दिवसांचे : पंचांगकर्ते मोहन दाते; जाणून घ्या पूजाविधी
sakal

बोलून बातमी शोधा

यावर्षी नवरात्र आठच दिवसांचे

या वर्षी दिनांक 7 ऑक्‍टोबर रोजी घटस्थापना होत असून, नवरात्रारंभ होत आहे.

यावर्षी नवरात्र आठच दिवसांचे : पंचांगकर्ते मोहन दाते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : या वर्षी दिनांक 7 ऑक्‍टोबर रोजी घटस्थापना होत असून, नवरात्रारंभ (Navratra Festival) होत आहे. या दिवशी चित्रा आणि वैधृति योग असला तरी घटस्थापना तिथिप्रधान असल्याने गुरुवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे 5 पासून दुपारी 1.45 पर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल. रविवारी (ता. 10) ललिता पंचमी असून, मंगळवारी (ता. 12) महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. बुधवारी (ता. 13) महाष्टमीचा उपवास करावयाचा असून 14 ऑक्‍टोबर रोजी गुरुवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) आहे आणि दुसऱ्या दिवशी 15 तारखेला शुक्रवारी दसरा आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते (Mohan Date) यांनी दिली.

पंचांगकर्ते दाते म्हणाले, यावर्षी घटस्थापनेपासून दसरा नवव्या दिवशी असला तरीही नवरात्रोत्थापन आठव्या दिवशीच असल्याने यंदाचे वर्षी नवरात्र आठच दिवसांचे आहे. चतुर्थी तिथीचा क्षय झाल्याने नवरात्र आठ दिवसांचे झाले आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे. नवरात्रामध्ये देवीस रोज एक माळ अर्पण करताना जितक्‍या दिवसाचे नवरात्र असेल तेवढ्या माळा अर्पण कराव्यात. तिथीचा क्षय असताना एकाच दिवशी दोन माळा अर्पण करू नये. त्यामुळे यावर्षी आठच माळा अर्पण कराव्यात.

हेही वाचा: नवरात्रोत्सवात मिरवणुकीला परवानगी नाहीच! जाणून घ्या नियमावली

यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे किंवा अशौचामुळे ज्यांना 7 ऑक्‍टोबर रोजी घटस्थापना करणे शक्‍य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्तीनंतर (अशौच संपल्यावर) 9 ऑक्‍टोबर, 10 ऑक्‍टोबर, 12 ऑक्‍टोबर किंवा 13 ऑक्‍टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व 14 रोजी नवरात्रोत्थापन करावे.

महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. 12 ऑक्‍टोबर रोजी रात्री 9.48 पर्यंत सप्तमी असली तरीही मध्यरात्री अष्टमी तिथी मिळत असल्याने त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. मात्र दुर्गाष्टमी 13 ऑक्‍टोबर रोजी आहे.

हेही वाचा: 'माझी मुलगी कलेक्‍टर होणारच!' वडिलांचे स्वप्न केले साकार

विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे 15 ऑक्‍टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी 14.21 ते 15.08 या दरम्यान आहे.

नवरात्रामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती याची वेगळी स्थापना करून पूजा केली जाते. काही जणांमध्ये इतर देवांची पूजा 9 दिवस केली जात नाही, ते अयोग्य आहे. अशा वेळेस पूजेतील इतर देवांची नेहमीप्रमाणे रोज पूजा केली पाहिजे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

loading image
go to top