गणेशाची मूर्ती कशी असावी? स्थापना कधी, पूजा कशी करावी? जाणून घ्या पंचांगकर्ते दातेंकडून 

ganapati puja
ganapati puja

दक्षिण सोलापूर (सोलापूर) ः गणेश चतुर्थी शनिवारी (ता. 22) असून, या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना व पूजन पहाटे ब्राह्म मुहूर्तापासून पहाटे 4 वाजून 47 मिनिटांपासून दुपारी एक वाजून 57 मिनिटांपर्यंत कोणत्याही वेळी करता येणार असल्याचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

यंदा कोरोना महामारीमुळे संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक मंडळांना अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव होणार नसला तरी घरोघरी मात्र परंपरेनुसार "श्रीं'चे आगमन शनिवारी होत आहे. यंदाचा गणेशोत्सव 11 दिवस लवकर आला आहे. अनंत चतुर्दशी मंगळवारी (ता. 1) आहे. गणेश चतुर्थीच्या प्रतिष्ठापनेसंदर्भात श्री. दाते म्हणाले, शनिवारी बाह्म मुहूर्तापासून म्हणजेच पहाटे चार वाजून 47 मिनिटांपासून मध्यान्ह समाप्तीपर्यंत म्हणजेच दुपारी 1 वाजून 57 मिनिटांपर्यंत आपापल्या व गुरुजींच्या सोयीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना व पूजन करावे. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्‍यकता नाही. 

ते पुढे म्हणाले, घरातील गणेशाची मूर्ती साधारणतः पाच ते सहा इंच (एक वीत) उंचीची असावी. ती व्यवस्थित आसनस्थ हवी. तिचे हात, पाय, डोळे, कान सुबक असतील असे पाहावे. हार घालताना, फुले वाहताना अडचण येऊ नये यासाठी मूर्तीच्या पाठीमागचे हात व कान यांमध्ये अंतर असेल अशीच मूर्ती आणावी. प्लास्टिक, फायबरच्या मूर्ती शास्त्राला मान्य नाहीत. मूर्ती शक्‍यतो चिकणमाती, शाडूची असावी. आदल्या दिवशीच सायंकाळी आणून ठेवावी म्हणजे सकाळी पूजन करणे सोईचे होईल. मूर्तीस सजविलेल्या मखरात, पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर बाप्पाला बसवावे. मूर्ती ठेवताना मूर्तीचे तोंड पूर्वेकडे किंवा पश्‍चिमेकडे असणे योग्य आहे, दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये. ते उत्तरेकडेही चालेल. घराच्या प्रवेशद्वाराला फुलांचे तोरण किंवा आंब्याच्या डहाळ्या लावाव्या. दारासमोर सुरेख रांगोळी काढावी. मंगलवाद्य म्हणून सनई, चौघडा, नादस्वरम्‌ यांची सीडी, कॅसेट हळू आवाजात लावावी. 

श्री गणपतीला लाल फुले का वहावीत? 
गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे फार महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे गणपतीचा वर्ण लाल आहे. पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते व त्यामुळे मूर्ती जागृत व्हायला मदत होते. 

नैवेद्य अर्थात मोदकाविषयी 
"मोद' म्हणजे आनंद व "क' म्हणजे भाग. मोदक म्हणजे आनंदाचा लहानसा भाग. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे "ख' या ब्रह्मरध्रांतील पोकळीसारखा असतो. कुंडलिनी "ख' पर्यंत पोचल्यावर आनंदाची अनुभूती येते. हाती धरलेला मोदक, म्हणजे आनंद प्रदान करणारी शक्ती. हे ज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणून त्याला ज्ञानमोदक असेही म्हणतात. ज्ञान प्रथम थोडे आहे असे वाटते (मोदकाचे टोक हे याचे प्रतीक आहे) पण अभ्यास करू लागल्यावर समजते, की ज्ञान हे फारच मोठे आहे. (मोदकाचा खालचा भाग हे त्याते प्रतीक आहे.) मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com