esakal | मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपची चुप्पी!
sakal

बोलून बातमी शोधा

मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपची चुप्पी!

मंदिराचे दरवाजे उघडा, या मागणीसाठी आक्रमक झालेला प्रमुख विरोधी पक्ष भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र मूग गिळून गप्प बसला आहे.

मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपची चुप्पी

sakal_logo
By
संतोष सिरसट -सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मंदिराचे दरवाजे उघडा, या मागणीसाठी आक्रमक झालेला प्रमुख विरोधी पक्ष भाजप (BJP) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र मूग गिळून गप्प बसला आहे. मागील जवळपास महिनाभरापासून शेतकऱ्यांचा (Farmers) माल कवडीमोल किमतीने विकला जात आहे, हे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला दिसत नाही का, असाही सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारांना पदाधिकारी करण्यात स्वारस्य दाखवणारा भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नी आंदोलन (Agitation) करेल का? याबाबत उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा: नवस फेडायला सायब राजकीय पक्ष कार्यालयात !

विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही, या एकमेव गोष्टीसाठी एकमेकांचे विरोधक असलेले शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्ष एकत्र आले व राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली गेली. सर्वाधिक सदस्य संख्या असतानाही भाजपला विरोधकाची भूमिका बजावावी लागत आहे. मागील आठवड्यामध्ये भाजपच्या वतीने राज्यभर शंखनाद व घंटानाद आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी भाजपने ही आंदोलने केली आहेत. एकीकडे बिअरबार सुरू असताना मंदिरे बंद का, असा सवाल भाजपने केला. ज्याप्रमाणे भाजपने मंदिरासाठी आंदोलन केले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी का केले नाही, असाही प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. मागील एक-दीड महिन्याच्या कालावधीत कोणत्याही शेतीमालाला भाव मिळत नाही. यावर प्रमुख विरोधी पक्ष म्हणवणारा भाजप काय करत आहे, असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो. मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करणं हे जसं क्रमप्राप्त आहे, तशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन करणं भाजपला क्रमप्राप्त वाटत नाही का? असाही सवाल संतप्त शेतकरी करत आहेत.

भाजपची सोशल मीडियाची टीम तत्पर आहे. नुकत्याच झालेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्याची खबर सर्वदूर पोचविण्याचे काम भाजपच्या या सोशल मीडिया टीमने केले आहे. मात्र मागील दीड महिन्यापासून शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पडले आहेत. कोणत्याही मालाला भाव मिळत नाही, हे भाजपच्या सोशल मीडियाला दिसले नाही का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडायचं नाही का? असा निर्णय भाजपने घेतला आहे का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी भाजप रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली आहे, तरच प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप शोभून दिसणार आहे.

हेही वाचा: मुलगी झाल्याने घडविला कोरोनाबाधित पत्नीचा मृत्यू!

यशाने हुरळून न जाता शेतकऱ्यांकडे बघा

नुकत्याच झालेल्या बेळगाव महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. त्या यशाने हुरळून जाण्याची आवश्‍यकता नाही. त्याऐवजी शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाव मिळत नाही, या मूलभूत प्रश्नांकडे त्यांनी लक्ष देणे भविष्यात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, हे मात्र नक्की.

विरोधी पक्षासाठी संधी

शेतात घाम गाळून कष्टाने पिकवलेल्या मालाची कवडीमोल किंमत होत असेल तर शेतकऱ्यांच्या कष्टाला काहीच अर्थ उरत नाही. बाजारात कोणत्याच मालाला भाव नसल्याने शेतकरी पिचून गेला आहे. तो सध्या आर्थिकदृष्ट्या खूपच अडचणीत आला आहे. राज्यातील सरकार असो किंवा केंद्रातील सरकार असो, शेतकऱ्यांकडे दोन्ही सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे खचून गेलेला शेतकरी आता आक्रमक होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांच्या अंतर्मनामध्ये फुलत असलेला आंदोलनरूपी निखारा ज्वलनशील होण्यापूर्वीच शेतमालाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे आणि हीच संधी विरोधी पक्षाने साधून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे.

loading image
go to top