Solapur News : सोलापुरात ‘वंदे भारत’च्या कोचिंग डेपोला मंजुरी; रेल्वे बोर्डाकडून ५० कोटींचा निधी; मध्य रेल्वेचा तिसरा डेपो

सोलापुरात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’साठी कोचिंग डेपो बांधण्याला अखेर रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. सुमारे ५० कोटी रुपये खर्चून हा डेपो बांधला जाईल.
approval for Vande Bharat coaching depot in Solapur 50 crore fund from Railway Board
approval for Vande Bharat coaching depot in Solapur 50 crore fund from Railway BoardSakal

- प्रसाद कानडे

Solapur News : सोलापुरात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’साठी कोचिंग डेपो बांधण्याला अखेर रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. सुमारे ५० कोटी रुपये खर्चून हा डेपो बांधला जाईल. यात पहिल्यांदाच कव्हर्ड (छत) पिटलाइन बांधण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून हे काम केले जाईल. याच्या निविदा प्रक्रियेलादेखील लवकरच सुरुवात होणार आहे.

सोलापुरात बांधला जाणारा हा मध्य रेल्वेचा तिसरा डेपो असणार आहे, अशी माहिती सोलापूर रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिली. सध्या मुंबई विभागात (वाडी बंदर) असा डेपो असून, दुसरा डेपो पुण्यातल्या घोरपडी भागात बांधण्याचे काम सुरू झाले आहे.

सोलापूर विभागातून सध्या दोन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावत आहेत. यात सोलापूर-मुंबई व कलबुर्गी-बंगळुरू यांचा समावेश आहे. पैकी मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची देखभाल व दुरुस्ती मुंबईत होत आहे, तर कलबुर्गीहून सुटणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे बंगळुरू येथे देखभाल व दुरुस्ती केली जात आहे.

सोलापूरला डेपो झाल्यानंतर येथेच डब्यांची देखभाल व दुरुस्ती केली जाईल. परिणामी भविष्यात सोलापुरातून सुटणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोचिंग डेपो महत्त्वाचा

देशात सध्या विविध लोहमार्गांवर ५१ ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावत आहेत. येणाऱ्या काळात ही संख्या आणखी वाढणार आहे. कोणत्याही स्थानकावरून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू होण्यासाठी ‘कोचिंग मेंटेनन्स डेपो’ असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या डेपोतच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या डब्यांची देखभाल - दुरुस्ती केली जाते.

याच्या डब्यांची रचना अन्य डब्याप्रमाणे नसल्याने सुरक्षेसाठी छत बनवली जात आहेत. त्यामुळे अन्य डेपोंत ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. मध्य रेल्वेत वाडी बंदर, पुण्यात घोरपडी जवळ ९० कोटी रुपये खर्चून असा डेपो बांधला जात आहे.

कसा असेल डेपो

  • ६०० मीटर लांबीची नवीन पिटलाइन

  • डब्यांच्या सुरक्षेसाठी कव्हर्ड शेड बांधण्यात येईल

  • एक रेकच्या देखभाल व दुरुस्तीसाठी किमान ६ तास लागतील

  • एक स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार

सोलापूरला कोचिंग डेपो होणे ही अत्यंत चांगली बाब आहे. यामुळे भविष्यात सोलापूरहून आणखी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू होऊ शकतात.

— पीयूष संगापूरकर, रेल्वे अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com