धक्कादायक! सोलापुरातील कोरोना बाधीत रुग्णांचा असा आहे वयोगट (Video)

The background of Corona interview of Doctor Sanjeev Thakur of Civil Hospital in Solapur
The background of Corona interview of Doctor Sanjeev Thakur of Civil Hospital in Solapur

सोलापूर : सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्ण आठ ते 61 वर्षांदरम्यानचे आहेत. रुग्णांना पौष्टिक आहाराबरोबर घरच्यांसारख्या सुविधा दिल्या जातात. या रुग्णांना ठणठणीत बरे करून दोन आठवड्यांत घरी पाठविण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोचार रुग्णालय प्रयत्न करीत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी "सकाळ'ला दिली. 
सोलापूर शहरात सहा दिवसांपूर्वी कोरोनाने प्रवेश केला. त्यानंतर सगळ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सरकारी यंत्रणा कामाला लागली. या रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार केले जातात, याबाबत सामान्य नागरिकांत उत्सुकता असते. त्याविषयी अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्याशी झालेला हा संवाद... 

सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांचे सरासरी वय? 
डॉ. ठाकूर : सोलापुरात रविवारी म्हणजे 12 एप्रिलला कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे समोर आले. संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे स्वॅब तपासण्यात आले होते. त्यानंतर तो रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. तो रुग्ण 56 वर्षांचा होता. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध प्रशासनाने घेतला. त्यात 12 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत समोर आले आहे. यामध्ये आठ वर्षांचे एक बाळ आहे. तर शेवटच्या रुग्णाचे वय 61 वर्षे आहे. त्यांची दिवसातून पॅरामीटरने सात ते आठ वेळा तपासणी केली जाते. त्यांना बरे करून दोन आठवड्यांत घरी पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

लॅबमधील प्रक्रिया कशी असते? 
डॉ. ठाकूर : सोलापुरात असलेल्या लॅबमध्ये तपासण्यासाठी स्वॅब घेतले जातात. या लॅबची क्षमता दिवसभरात 90 नमुने तपासण्याची आहे. येथे सोलापूरसह लातूर आणि उस्मानाबाद येथून स्वॅब येतात. शुक्रवारी सकाळपासून 33 नमुने तपासले. सायंकाळी 22 अहवाल आले आहेत. याबरोबर सायंकाळ सहा वाजेपर्यंत 134 नमुने मिळाले. 24 तास लॅब सुरू आहे. व्यवस्थित अहवाल येण्यासाठी 10 तास लागतात. काही तांत्रिक अडचणीमुळे अहवाल येण्यासाठी उशीर होऊ शकतो. पूर्वी पुण्याला नमुने पाठवले जात होते. त्याला जास्त कालावधी लागत होता. आता तेवढा वेळ लागत नाही. 

अहवाल येण्यासाठी उशीर का लागतो? 
डॉ. ठाकूर : नमुना तपासणीचा अहवाल लवकर येण्यासाठी लागणारी रॅपिड टेस्ट अद्याप आपल्या देशात आलेली नाही. तो तास ते दीड तासात मिळतो. आम्ही 24 तास काम करत आहोत. रुग्णही पाहावे लागतात. त्यांनाही उपचार द्यावे लागतात. तपासणीत एखादा अहवाल पॉझिटिव्ह आला तरी त्याची पुन्हा तपासणी करावी लागते. तीन प्रक्रियेतून त्याला जावे लागते. एकदा अहवाल आला तरी पुन्हा त्याला तपासावे लागते. याचा विचार करूनच अहवाल द्यावा लागतो. ही प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो. तरी एक दिवसात अहवाल दिला जातो. 

उस्मानाबाद आणि लातूर येथून किती नमुने येतात? 
डॉ. ठाकूर : उस्मानाबाद आणि लातूर येथील नमुने हे कमी जास्त होऊ शकतात. तेथील परिस्थितीनुसार येतात. आज सायंकाळी 134 अहवाल आले आहेत. तर दिवसभरात 162 अहवाल दिले आहेत. 

रुग्णालयाचे नियोजन कसे आहे? 
डॉ. ठाकूर : कोरोनाची तीव्रता पाहून आम्ही तयारी केली आहे. पूर्वी सहा बेडचाच आयसोलेशन वॉर्ड होता. आता 120 बेडची तयारी केली होती. त्यानंतर आम्ही एक ब्लॉक कोरोना वॉर्ड म्हणून तयार केला. त्यानंतर हेल्पलाइन सुरू केली. डॉक्‍टर, नर्स यांच्याशी संबंधितांना ट्रेनिंग दिले आहे. डॉक्‍टर, नर्स यांनी घाबरू नये म्हणून त्यांचे मनोधैर्य वाढवले आहे. रुग्णानेही घाबरू नये म्हणून त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

रुग्णांसाठी कोणत्या सुविधा आहेत? 
डॉ. ठाकूर : कोरोनाबाधित रुग्णांचे मनोधैर्य वाढावे म्हणून टीव्ही बसवण्यात येणार आहे. त्यांना सकस आहारही दिला जातो. त्यांच्याबरोबर असलेल्या एका नातेवाइकाला जेवणही दिले जात आहे. त्यांना गरम पाणी थर्मासची ऑर्डर करत आहोत. रुग्णाला आपण घरी राहत आहोत असे वाटावे, अशा सुविधा आम्ही देत आहोत. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय मुखर्जी व वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे.

लॅबमध्ये कितीजण असतात? 
डॉ. ठाकूर : लॅबमध्ये कमीत कमी डॉक्‍टर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. एकावेळी पाच ते सहाजण लॅबमध्ये असतात. 16 लोक 24 तास काम करत असतात. त्यांना सुटी नसते. याशिवाय पर्याय नसतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com