esakal | आणि बनीराम पाटील झाला सखाराम कदम..!
sakal

बोलून बातमी शोधा

Sakharam Kadam

आणि बनीराम पाटील झाला सखाराम कदम..!

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

आषाढी यात्रेच्या गर्दीत 29 वर्षांपूर्वी मतिमंद असलेला बनीराम चुकला. वाखरी येथून तो पंढरपूर तालुक्‍यातील गादेगावात आला.

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेच्या (Ashadhi Yatra) गर्दीत 29 वर्षांपूर्वी मतिमंद असलेला बनीराम चुकला... वाखरी येथून तो पंढरपूर (Pandharpur) तालुक्‍यातील गादेगावात आला... एका हॉटेलमध्ये मदत करू लागला आणि गादेगावशीच एकरूप झाला... एका कुटुंबाने त्याला आपलेच मानले आणि तो बनीराम पाटीलचा सखाराम कदम झाला... ही गोष्ट आहे 1992 मधील आषाढी यात्रेतील. (Baniram Patil, who lost in Ashadhi Yatra, became Sakharam Kadam)

हेही वाचा: "ऑनलाइन' तहकूब, "ऑफलाइन'चा प्रस्ताव ! झेडपी शोधतेय मोठे सभागृह

1992 मधील आषाढी यात्रेत वाखरी येथील पालखी तळ परिसरातील गर्दीत कुटुंबीयांसह आलेला बनीराम हरवला. वाखरी येथून तो गादेगावात आला. तिथे तुकाराम कदम हॉटेल चालवत होते. सखाराम गावात फिरून हॉटेलमध्ये आला आणि हॉटेलमध्ये मदत करू लागला. त्या वेळेस सखाराम येण्याच्या अगोदर तुकाराम कदम यांचे बंधू महादेव कदम (वय 16) यांचे छातीच्या आजाराने निधन झाले होते. त्यानंतर काही दिवसांनंतर लगेचच सखाराम त्यांच्याकडे आल्याने तुकाराम कदम यांच्या आई काशीबाई कदम यांनी अपरिचित, अनोळखी असलेल्या सखारामलाच आपला लेक मानले.

हेही वाचा: कोरोनाचे आव्हान स्वीकारत "त्याने' केली आयटी कंपनीची स्थापना!

सखाराम मतिमंद असल्याने त्याच्या वागण्याला मर्यादा होती. तो अस्वच्छ राहायचा. काशीबाई कदम यांनी त्याला सांगून, शिकवून त्याच्यात बरीच सुधारणा केली. कदम कुटुंबाने त्याला आपल्या कुटुंबातील सदस्य मानले आणि तो सखाराम ज्ञानेश्वर कदम या नावाने ओळखला जाऊ लागला. सखाराम नेमका कोणत्या गावचा आहे? याचा मात्र शोध लागत नव्हता. मागील पाच वर्षांपूर्वी एका ऊसतोड मजुराच्या मदतीने सखारामच्या गावाचा शोध लागला. सखारामचे खरे नाव बनीराम शिवराम पाटील असून त्याचे मूळ गाव मंगुळझनक (ता. मेहकर, जिल्हा वाशीम) असल्याची माहिती समजली.

गादेगावातील कदम यांनी सखारामच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाल्याचे समजले. तब्बल पंचवीस वर्षांनंतर मुलाचा शोध लागल्याने सखारामची आई आणि अन्य कुटुंबीय तातडीने गादेगावात आले. सखारामची आणि त्याच्या आईची गळाभेट झाली. त्यांनी सखारामला त्यांच्या सोबत गावी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सखाराम त्यांच्या गाडीपर्यंत गेला; परंतु तब्बल पंचवीस वर्षांच्या सहवासामुळे सखारामला मानलेली आई आणि अन्य कदम कुटुंबीयांना सोडून जाणे अशक्‍य झाले. मला तिकडे यायला जमणार नाही, असे सांगून सखारामने गादेगावातील कदम कुटुंबीयांसोबतच राहणार असल्याचे त्याच्या कुटुंबीयांना सांगितले. सखारामची स्थिती पाहून उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू आले.

आषाढी यात्रेचे आता वेध लागले असल्याने सखारामच्या आमच्या घरी येण्याच्या घटनेची पुन्हा आठवण येते. 29 वर्षांपूर्वी गर्दीत चुकून घरी आलेला सखाराम गावचा रहिवासी व आमच्या घरचा कायमचा सदस्य झाल्याने तो आपल्याला काका समानच आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि सखाराम काका आमच्या घरी येण्याने घरात, व्यवसायात सुखसमृद्धी नांदत आहे, अशा भावना संजय देविदास कदम (गादेगाव) यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या.

loading image