बार्शीकरांनो आनंदाची बातमी! नैसर्गिक स्रोतातून मिळतेय दररोज 80 लाख लिटर पाणी | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नैसर्गिक स्रोतातून बार्शीने मिळवले दररोज 80 लाख लिटर पाणी
बार्शीकरांनो आनंदाची बातमी! नैसर्गिक स्रोतातून मिळतेय दररोज 80 लाख लिटर पाणी

नैसर्गिक स्रोतातून बार्शीने मिळवले दररोज 80 लाख लिटर पाणी!

बार्शी (सोलापूर) : शहराची लोकसंख्या वाढत असताना पाणी पुरवठ्याचा (Water Supply) प्रश्न नगरपरिषदेला कायम भेडसावत होता. असे असतानाच केवळ उजनी जलाशयावर अवलंबून राहून उपयोग नाही तर शहरातील चार विहिरींचे नैसर्गिक स्रोत असलेले पाणी एकत्र केले, जलशुद्धीकरण केंद्रात आणून एक वर्षांपासून सुरू असलेला प्रयोग यशस्वी झाला असून, यापुढे एक दिवसाआड पाणीपुरवठा शहरवासीयांना होईल. राज्यात वेगळा प्रयोग करण्यात यशस्वी झालो आहोत, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा: कोरोना अंगावर काढू नका! 23 वर्षीय तरुणीची नऊ दिवसांची झुंज संपली

बार्शी-कुर्डुवाडी संयुक्त पाणी पुरवठा योजना 1996 साली कार्यान्वित झाली. 65 टक्के बार्शी अन्‌ 35 टक्के पाणी कुर्डुवाडी असे वितरण सुरू झाले, पण विजेच्या तांत्रिक अडचणीमुळे तसेच वारंवार पाइपलाइन गळतीमुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. शहरातील भगवंत देवस्थान, कोर्ट, जवाहर हॉस्पिटल, येडाई विहीर अशा चार विहिरींचे पाणी विद्युतपंप लावून उपसा सुरू केला असून, प्रत्येक विहिरीचे 20 लाख लिटरप्रमाणे दररोज 80 लाख लिटर पाणी उपलब्ध होत आहे. तर चांदणी प्रकल्पातून 50 लाख लिटर तर उजनी धरणाच्या जलाशयातून दररोज 1 लाख 80 हजार लिटर पाणी उपलब्ध होत आहे.

दररोज 90 लाख लिटर पाणी उपलब्धतेसाठी पाणीपुरवठा योजना राबवली असती तर सुमारे 100 कोटी रुपये खर्च आला असता; पण नगरपरिषदेकडे असलेले जुने पाइप व इतर साहित्याचा वापर करून चार विहिरींची पाइपलाइन केली व जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले आहे. यासाठी अवघा 25 लाख रुपये खर्च आला आहे.

हेही वाचा: एसटी महामंडळ 'या'मुळे खड्ड्यात! 700 बस खरेदीची निविदा

शासनाच्या माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत नुकतेच परिपत्रक प्राप्त झाले असून, विहीर पुनर्जीवन, गाळ काढणे, पाण्याचा स्रोत एकत्र करावा व वापर करावा असे म्हटले आहे. यासाठी 400 गुण आहेत पण एक वर्षाच्या तपश्‍चर्येनंतर आम्ही पाणी नियोजन करण्यात यशस्वी झालो आहोत, असे आमदार राजेंद्र राऊत यांनी या वेळी स्पष्ट केले. आगामी पाच वर्षात शहराची लोकसंख्या तीन लाख होईल, यादृष्टीने 4 लाख 50 हजार लिटरचा उजनी जलाशयातून पाणीपुरवठा योजनेचा 300 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, आगामी तीन वर्षात पूर्ण होईल, असेही आमदार राऊत यांनी या वेळी सांगितले.

loading image
go to top