esakal | गृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी केली पाच लाखांची मागणी ! व्यापाऱ्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Barshi Police

गृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी केली पाच लाखांची मागणी ! व्यापाऱ्याचा आरोप

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात फक्त वैद्यकीय सुविधा सोडता अन्य कोणालाही आस्थापने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने कडक निर्बंधांमध्ये सोन्याचे दुकान सुरू ठेवल्याने काल बार्शी शहर पोलिसांनी दुकान सील केलं होत. मात्र बार्शी शहर पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली आणि ते देण्यास नकार दिल्याने दुकान सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी गुगळे यांनी केला आहे.

दरम्यान, हे सर्व हप्ते गृहमंत्रालयापर्यंत पोचवावे लागतात, असंही पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावींनी सराफ व्यावसायिक गुगळेंना म्हटल्याचा आरोप केला आहे. याबाबतचा व्हिडिओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्‌वीट करत या प्रकरणाला उजेडात आणलं आहे.

हेही वाचा: "माणसा सुधर, नाही तर प्रत्येक घर होईल दवाखाना !'

या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याशी दूरध्वनीद्वारे बातचीत केली असता, त्यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळले आहेत आणि संबंधित सराफ व्यापाऱ्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांची प्रतिमा मलीन करणाऱ्या सावकारावर लवकरच गुन्हा दाखल : पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी

बार्शी शहर कॉंग्रेस अध्यक्ष जीवनदत्त आरगडे यांनी शनिवार-रविवारी बार्शी शहरात कडक लॉकडाउन असतानाही शनिवार, 17 एप्रिल रोजी बार्शी शहरातील चांदमल ज्वेलर्स हे दुकान उघडे असल्याची माहिती बार्शी शहर पोलिस स्टेशनला कळवली. याची पाहणी करण्यासाठी बार्शी शहरचे पोलिस कर्मचारी गेले असताना सदरील दुकान सुरू असल्याचे आढळून आल्यामुळे बार्शी शहर पोलिस स्टेशन येथे चांदमल ज्वेलर्सचे मालक गुगळे यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला.

हेही वाचा: बाईकवर डबलसीट फिरताय तर सावधान ! लायसनसह होणार वाहन जप्त

या अगोदरही गेल्या पंधरा दिवसांखाली सावकारी गुन्ह्याखाली व दमदाटी करून नागरिकांची मालमत्ता हडप करण्याचे गुन्हा नोंद झालेला असल्याची माहिती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली. तसेच काही यू-ट्यूब चॅनेलला खोट्या मुलाखती देऊन त्याचबरोबर पूर्वग्रहदूषित होऊन अशा प्रकारचे खोटे व पोलिसांचे चारित्र्यहनन करणारे तथ्यहीन आरोप केलेले आहेत. पोलिस प्रशासनाची बदनामी करत असल्याचे आढळून आल्यामुळे लवकरच गुगळे यांच्यावर पोलिस प्रशासनामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले.

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये