esakal | ट्‌विटरवरून जाहीर झाली राष्ट्रवादीची उमेदवारी ! भगीरथ भालके उद्या भरणार अर्ज 
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagirath_Bhalke

गेले काही दिवस राजकीय पातळीवर चर्चेत असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? ही चर्चा निकाली लागली असून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी ट्‌विटरवरून जाहीर करून त्यांच्या विजयाला शुभेच्छा दिल्या. 

ट्‌विटरवरून जाहीर झाली राष्ट्रवादीची उमेदवारी ! भगीरथ भालके उद्या भरणार अर्ज 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : गेले काही दिवस राजकीय पातळीवर चर्चेत असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? ही चर्चा निकाली लागली असून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी ट्‌विटरवरून जाहीर करून त्यांच्या विजयाला शुभेच्छा दिल्या. 

स्व. भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भालके कुटुंबीयांबरोबर काही राजकीय निरीक्षकांनी पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आणले होते. पवार कुटुंबीयांनी पार्थ पवार यांच्या नावाचा कुठे संबंध येऊ दिला नाही, त्यामुळे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार भगीरथ भालके की त्यांच्या पत्नी जयश्री भालके, या दोघांपैकी कोण राहणार, याची उत्सुकता लागली होती. 

दरम्यान, पंढरपूरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी निवडीवरून झालेला राजकीय गोंधळ शांत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच पंढरपूर दौरा केला असता, त्यांनी पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार जनतेच्या मनातील असणार, असे सूतोवाच केले. राष्ट्रवादीबद्दल धनगर समाजाचा असलेला रोष शांत करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या मतदारसंघात स्व. भालके यांच्याबद्दल सहानुभूती असल्यामुळे धनगर समाजातील इच्छुक तरुणांना त्यांनी शांत राहण्याचे आवाहन केले व आपल्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. त्यामुळे भगीरथ भालके यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. 

त्याच अनुषंगाने भगीरथ भालके यांनी मंगळवेढा- पंढरपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आपण उमेदवार असून, शिवाय स्व. भारत भालके यांनी मतदारसंघात केलेले काम सांगताना त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मला विजयी करा, असे आवाहन करत आहेत. याच मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून समाधान आवताडे यांची उमेदवारी निश्‍चित केल्यानंतर लगेच राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या आखाड्यामध्ये उमेदवार किती उरतात, यापेक्षा होणारी लढत दुरंगी असल्याचे राजकीय पातळीवर बोलले जात आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंढरीच्या नगरीत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते येत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल