'विठ्ठल'साठी भगीरथ भालके व्यस्त! डॉ. प्रणिता मतदारांच्या संपर्कात | Political | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'विठ्ठल'साठी भगीरथ भालके व्यस्त! डॉ. प्रणिता मतदारांच्या संपर्कात
'विठ्ठल'साठी भगीरथ भालके व्यस्त! डॉ. प्रणिता मतदारांच्या संपर्कात

'विठ्ठल'साठी भगीरथ भालके व्यस्त! डॉ. प्रणिता मतदारांच्या संपर्कात

sakal_logo
By
हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला (Vitthal Sugar Factory) आर्थिक मदत उपलब्ध करण्यासाठी अध्यक्ष भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) व्यस्त आहेत. त्यामुळे सध्या मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू आहे. असे असतानाच, आता त्यांच्या पत्नी डॉ. प्रणिता भालके (Dr. Pranita Bhalke) या जनसंपर्कात सातत्य ठेवून लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होत आहेत.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

दांडगा जनसंपर्क आणि लोकांना हाताळण्याच्या एका विशिष्ट पद्धतीमुळे तीन निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांतून लढूनही स्व. आमदार भारत भालके यांना पंढरपूर- मंगळवेढ्यातील जनतेने स्वीकारले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचे वलय निर्माण केले होते. परंतु, त्यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत निसटत्या मताने भगीरथ भालके यांचा पराभव झाला. हा पराभव राष्ट्रवादीला व भालके परिवाराला धक्का देणारा ठरला. आतापर्यंत पंढरपुरातील राजकारण उसाभोवती व मंगळवेढ्याचे राजकारण पाण्याभोवती फिरत राहिले आहे. भालकेंना मानणाऱ्या अनेकांनी साखर कारखान्यातील अडचणी दूर करणे व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी मतदारसंघातील गाठी- भेटीऐवजी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करा, असा सल्ला भगीरथ भालके यांना दिला. त्यानंतर भगीरथ भालके यांनी बंधू व्यंकट भालके, शेखर भालके, पत्नी डॉ. प्रणिता भालके, स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्त्यांवर मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.

मतदारसंघात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने हे सर्वजण लोकांच्या संपर्कात आहेत. याचा फायदा भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतो. स्व. भालके यांचे संपर्क कार्यालय सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पूर्वीसारखे खुले ठेवले असून, यापूर्वी तालुक्‍यातल्या अनेक प्रश्नांबाबत या कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा झाला आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात आवश्‍यक असलेली कागदपत्रे व पाठपुरावा स्व. भालके यांच्या पश्‍चात देखील सुरूच आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेमुळे हे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. भगीरथ भालके सध्या व्यस्त असले तरी डॉ. प्रणिता भालके यांचा संपर्क मात्र भालके गटाला भविष्यासाठी आधार देणारा ठरत आहे. या भेटीत कार्यकर्त्यांकडून स्व. भालके यांनी सुख-दु:खात केलेल्या मदतीची जाणीव ठेवून भालके कुटुंबाला अडचणीच्या काळात मदतीपेक्षा सोबतीची आवश्‍यकता असल्याचे बोलून दाखवत आहेत.

हेही वाचा: 2 ते 17 वर्षांच्या मुलांना COVAXIN चा डोस! जानेवारीपासून लसीकरण

दिवंगत भारत भालकेंच्या पाठपुराव्यामुळे गावे पूर्ववत

स्व. भारत भालके यांच्या आजारपणात पुणे येथील रुग्णालयातील बेडवरून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसंदर्भात त्यांचा पाठपुरावा सुरू होता. पुत्र भगीरथ भालके यांच्यासह पांडुरंग चौगुले, लतीफ तांबोळी, सुरेश कोळेकर, तानाजी काकडे, हर्षराज बिले, रामचंद्र मळगे, बसवराज पाटील यांना सोबत घेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांना मोबाईल दिला होता. जलसंपदामंत्री पाटील यांनी स्व. भालके यांची तळमळ लक्षात घेऊन या योजनेतील पाणी आणि गावे पूर्ववत ठेवण्याचा शासननिर्णय नुकताच पारित केला. ही बाब वंचित गावांना दिलासा देणारी ठरली आहे.

loading image
go to top